Magel Tyala Saur Krushi Pamp Yojana : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज आर्थिक वर्ष 2024-25 चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात आज शेतकऱ्यांसहित समाजातील प्रत्येक वर्गातील नागरिकांसाठी घोषणा करण्यात आल्या आहेत. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीचा थरार संपला आहे.
यामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीला जबर फटका बसला असून त्यांच्या खासदारांच्या संख्याबळात यावेळी मोठी कपात पाहायला मिळत आहे.
महायुतीचे अनेक दिग्गज उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. यामध्ये तर काही मंत्र्यांचा देखील समावेश आहे. शेतकऱ्यांची नाराजी ही महायुतीला लोकसभा निवडणुकीत चांगलीच जड भरली आहे.
यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही अशीच परिस्थिती तयार होऊ नये यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा झाल्या आहेत.
गेल्या खरीप हंगामात म्हणजेच 2023-24 खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन लागवड केली होती त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत देण्याची मोठी घोषणा आज अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
यामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल अशी आशा आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात उत्पादित झालेल्या कापसाला आणि सोयाबीनला बाजारात चांगला भाव मिळाला नाहीये. अजूनही कापूस आणि सोयाबीनचे बाजार भाव दबावातच आहेत.
यामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात मोठी नाराजी आहे. हीच नाराजी दूर करण्यासाठी या शेतकऱ्यांना आता हेक्टरी 5,000 रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय, आज जातील शेतकऱ्यांसाठी मागील त्याला सौर कृषी पंप योजनेची देखील घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा व्हावा यासाठी पंधरा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे.
शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी, दिवसा सुद्धा अखंडित वीजपुरवठा राहावा यासाठी राज्यातील जवळपास आठ लाख 50 हजार शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामुळे जर ही योजना कार्यान्वित झाली तर याचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार असा विश्वास व्यक्त होत आहे.