Lemon Rate : आपल्या महाराष्ट्रात लिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. राज्यातील पश्चिम भागात लिंबाचे उत्पादन विशेष उल्लेखनीय आहे. मात्र लिंबाला हिवाळ्यात मागणी कमी असते. शिवाय हिवाळ्यात उत्पादन अधिक निघते.
परिणामी आवक वाढते आणि दरात कायमच घसरण होते. उन्हाळ्यात मात्र लिंबाची मागणी वधारलेली असते यामुळे लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो आणि उत्पन्नात वाढ होते. सध्या थंडीचा कडाका जाणवत असल्याने लिंबाच्या दरात घसरण झाली आहे.
मागणीमध्ये होणारे घट आणि वाढणारी आवक यामुळे दरात घसरण होत असून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल समीकरण यंदा देखील कायम आहे. पुण्याच्या गुलटेकडी मार्केटमध्ये देखील लिंबाची आवक वाढली आहे आणि दरात घसरण आहे. सध्या 40 ते 50 पैसे प्रति नग याप्रमाणे लिंबाचे घाऊक बाजारात विक्री होत असून किरकोळ बाजारात मात्र लिंबाला एक रुपये प्रति नग असा दर मिळत आहे.
यामुळे लोणचे उत्पादकांनी लिंबाची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यास सुरुवात केली आहे. मात्र याचा दराला आधार मिळत नसल्याचे चित्र असून बाजार भाव दबावातच पाहायला मिळत आहे. म्हणजेच लोणचे उत्पादकांना सोन्याचे दिवस आले आहेत तर लिंबू उत्पादकांना नुकसान सहन करावे लागत आहे. गुलटेकडी मार्केटयार्ड फळबाजारात प्रामुख्याने नगर जिल्हा, राशीन, श्रीगोंदा, सोलापूर, बार्शी आदी भागातील लिंबांची आवक मोठ्या प्रमाणात होत असते.
सध्या बाजारात दररोज सुमारे ३ ते ४ हजार गोणी इतकी आवक होते. एका गोणीत प्रतवारी तसेच आकारमानानुसार ३०० ते ४५० लिंबे असतात. सध्या घाऊक बाजारात लिंबांच्या एका गोणीला १०० ते २५० रुपये असा भाव मिळत आहे. थंडीमुळे सध्या लिंबाला गिऱ्हाईक कमी आहे. आता जास्त गिन्हाईक हे लोणचे उत्पादकच आहेत, अशी माहिती फळबाजारातील लिंबांचे आडतदार रोहन जाधव यांनी दिली.
थंडी आणि पावसाळ्यात लोणचे उत्पादकांकडून लिंबांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. फेब्रुवारी ते मे महिन्यादरम्यान लिंबांच्या मागणीत वाढ होते. त्या वेळी लिंबांचे दर तेजीत असतात. गेल्या वर्षी उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लिंबाची तोडणी केली. त्यामुळे पावसाळ्यात मर्यादित लिंबाची आवक झाली. आता थंडीत लिंबांना मागणी नाही. त्यामुळे लोणचे उत्पादकांकडून मोठी खरेदी होत असून पुढील महिना ते दीड महिना लोणचे उत्पादकांकडून लिंबाची खरेदी सुरू राहील, असेही सांगण्यात आले.
सध्या लिंबांना मिळत असलेले भाव पाहता शेतकऱ्यांना वाहतूकखर्च, लिंबांची तोडणी, उत्पादन खर्च भागवणे मुश्कील झाले आहे. वाढलेली लिंबांची आवक आणि थंडीमुळे मागणी नाही. त्यामुळे सध्या तरी लोणचे उत्पादकांवरच शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागत आहे. दीड ते दोन महिन्यांनंतर लिंबाचे दर वाढतील. – रोहन जाधव, लिंबाचे व्यापारी मार्केटयार्ड, पुणे.