Lek Ladaki Yojana Arj : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकारने देखील राज्यातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत.
सरकार प्रामुख्याने महिला सक्षमीकरणावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. यामुळे महिलांसाठी आणि मुलींसाठी शासनाने अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत.
यात अलीकडे सुरू झालेल्या लेक लाडकी योजनेचा देखील समावेश होतो. विशेष म्हणजे या योजनेची महाराष्ट्रात सुरुवातही झाली आहे. या योजनेसाठी राज्य शासनाने निधीची उपलब्धता करून दिलेली आहे.
अशा परिस्थितीत आता आपण या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी कुठे आणि कसा अर्ज करावा लागेल ? याविषयी थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
योजनेचे स्वरूप थोडक्यात
लेक लाडकी योजनेअंतर्गत राज्यातील मुलींना एक लाख एक हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. मुलीचा जन्म झाल्यावर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर 6 हजार रुपये, सहावीत गेल्यावर 7 हजार रुपये, 11 वीत गेल्यावर 8 हजार रुपये, 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये, असे एकूण 1 लाख 1 हजार रुपये मिळणार आहेत.
कोणाला लाभ मिळणार
या योजनेचा लाभ राज्यातील सर्वच कुटुंबातील मुलींना मिळणार नाही. पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींनाच या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.
1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना त्याच प्रमाणे 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास 1 मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता, पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहणार आहे. वार्षिक एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींनाच याचा लाभ मिळणार आहे.
अर्ज कुठं करणार
या योजनेसाठी तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे अर्ज केला जाऊ शकतो. अर्ज केल्यानंतर अंगणवाडी सेविकाकडून पोचपावती घ्यायची आहे.
याशिवाय तुम्ही तुमच्या संबंधित बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे जाऊन या योजनेसाठी अर्ज दाखल करू शकता. बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडून या योजनेची अधिकची माहिती तुम्हाला मिळू शकणार आहे.