Ladli Bahan Yojana : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी थांबली असून केंद्रात नवीन सरकार स्थापित झाले आहे. पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीने सत्ता काबीज केली आहे. मात्र, या निवडणुकीत बीजेपीला मोठा फटका बसला आहे. गेल्या दोन्ही निवडणुकीत म्हणजे 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बीजेपीला स्वबळावर बहुमत मिळाले होते.
या निवडणुकीत मात्र भारतीय जनता पक्षाला तो मॅजिकल बहुमताचा आकडा म्हणजे 272 खासदारांचा आकडा गाठता आला नाही. राम मंदिरासारखा पाचशे वर्षांपूर्वीचा प्रलंबित प्रश्न, हिंदूंची सर्वाधिक मोठी मागणी पूर्ण झालेली असतानाही बीजेपीला मोठा फटका का बसला ? या गोष्टींचे मंथन केले जात आहे.
बीजेपी ला सर्वाधिक फटका महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेश मध्ये बसला आहे. दरम्यान राज्यात येत्या तीन महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे महायुतीला फटका बसला आहे तसा फटका विधानसभेच्या निवडणुकीत बसू नये यासाठी आता महायुतीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहे.
यासाठी महायुतीचे शिंदे सरकार विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकाभिमुख योजनांचा धडाका लावणार असे चित्र आहे. यासाठी शिंदे सरकारने युद्धपातळीवर कामाला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील गोरगरीब निम्न मध्यमवर्गीय महिला मतदारांना खुश करण्यासाठी शिंदे सरकार मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर लाडली बहन योजनेसारखी नवीन योजना सुरू करू शकते असे म्हटले जात आहे.
मध्यप्रदेश मध्ये शिवराज सिंग चौहान यांनी सुरू केलेल्या लाडली बहन योजनेचा तेथील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला फायदा झाला होता. शिवराज सिंग अर्थातच मामा यांनी एमपी मधील बहिणींसाठी सुरू केलेल्या या योजनेला तेथील सर्वसामान्य नागरिकांनी खूपच प्रेम दाखवले आणि याचा फायदा लोकसभा निवडणुकीतही झाला.
लोकसभा निवडणुकीत एमपी मधील 25 पैकी 25 जागा भारतीय जनता पक्षाच्या खात्यात जमा झाल्यात. हेच कारण आहे की आता शिवराज मामा यांची ही योजना महाराष्ट्रात देखील सुरू होणार असे चित्र आहे. एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले गेले आहे की, याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्र्यांनी तयार केला आहे.
विशेष म्हणजे या प्रस्तावाचे सादरीकरण मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समोर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांनी या योजनेत काही नाममात्र बदल सुचवले आहेत.
या योजनेचा राज्यातील जवळपास दीड कोटी महिलांना लाभ होणार असा दावा केला जात आहे. मध्यप्रदेश मध्ये सुरू करण्यात आलेल्या लाडली बहन योजनेअंतर्गत तेथील गरीब, गरजू महिलांना महिन्याकाठी 1250 रुपयांची रक्कम दिली जाते. मात्र महाराष्ट्रात यापेक्षा जास्तीची रक्कम महिलांना मिळू शकते असे सांगितले जात आहे.
मध्यप्रदेश मधील लाडली बहन योजना नेमकी कशी आहे
मध्यप्रदेश मध्ये लाडली बहन योजना ही माजी मुख्यमंत्री शिवराज मामा यांच्या कार्यकाळात सुरू झाली. शिवराज मामा यांची ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा तेथील भाजपा सरकारला विधानसभा निवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला. एमपी मधील या योजनेचा तेथील एक कोटी 29 लाख महिलांना फायदा होत आहे. विधवा, विवाहित, घटस्फोटीत महिलांना या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला बाराशे पन्नास रुपयांची रक्कम मिळत आहे.
21 वर्ष ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला यासाठी पात्र ठरतात. दरम्यान आपल्या महाराष्ट्रातही या योजनेचे असेच काहीसे नियम राहू शकतात आणि या योजनेचा राज्यातील पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक महिलांना लाभ मिळू शकतो असे म्हटले जात आहे.