Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. यासाठी एक जुलैपासून अर्ज केले जात असून जुलैमध्ये अर्ज केलेल्या पात्र महिलांना या योजनेचे दोन महिन्यांचे पैसे देखील मिळाले आहेत. रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे राज्यातील एक कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपासून म्हणजेच 14 ऑगस्टच्या सायंकाळपासून जुलैमध्ये अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली होती. 19 ऑगस्टपर्यंत जुलैमध्ये अर्ज केलेल्या आणि पात्र ठरलेल्या सर्वच महिलांना याचा लाभ मिळाला.
मात्र ज्यांनी ऑगस्टमध्ये अर्ज सादर केला होता अशा महिलांच्या खात्यात अजून या योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. यामुळे या संबंधित अर्जदार महिलांच्या माध्यमातून त्यांना या योजनेचा लाभ कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
दरम्यान याच संदर्भात आता राज्य सरकारने मोठी माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज सादर केले आहेत अशा महिलांना 31 ऑगस्ट पासून पैसे मिळतील अशी घोषणा केली आहे.
यामुळे राज्यातील लाखो महिलांना दिलासा मिळणार आहे. 31 ऑगस्ट पासून ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या जवळपास 45 ते 50 लाख महिलांना जुलै आणि ऑगस्ट चे तीन हजार रुपये दिले जाणार आहेत. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर हसू फुलणार आहे.
नागपूरमध्ये भरणार भव्य मेळावा
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे 31 ऑगस्टला भव्य मेळाव्याचे आयोजन होणार आहे. लाडकी बहीण योजनेचा हा दुसरा भव्य मेळावा राहणार असून याच मेळाव्यातून ऑगस्टमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना पैसे दिले जाणार आहेत.
ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केले आहेत त्या अर्जांची सध्या शासन स्तरावर युद्धपातळीवर पडताळणी सुरू आहे. ही पडताळणी लवकरच पूर्ण होईल आणि पात्र ठरणाऱ्या महिलांना 31 ऑगस्ट ला पैसे मिळतील असे मंत्री महोदयांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
कशी आहे योजना ?
मध्यप्रदेशच्या लाडली बहना योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. ही राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये म्हणजेच एका वर्षात 18 हजार रुपये दिले जाणार आहेत. 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला यासाठी पात्र ठरणार आहेत. विशेष म्हणजे कुटुंबातील एका अविवाहित महिलेलाही याचा लाभ मिळणार आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिला यासाठी पात्र ठरणार आहेत.
याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना मिळणार आहे. पण ज्या महिलांचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला असेल आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले असेल अशा महिला देखील याच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत.