Ladki Bahin Yojana : सध्या लाडकी बहीण योजनेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. अशातच आता फक्त 2 अपत्य असणाऱ्या महिलांनाचं याचा लाभ मिळणार की काय अशा नवीन चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चेला भाजप आमदाराच्या एका विधानामुळे उधाण आले आहे.
खरेतर विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना सुरु झाली. निवडणुकीत याचा मोठा इम्पॅक्ट सुद्धा पाहायला मिळाला. या योजनेमुळे महिलांनी मोठ्या प्रमाणात महायुतीच्या बाजूने मतदान केले अन महायुतीला अभूतपूर्व असे यश मिळाले.
आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे, फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून नुकत्याच काही दिवसांपूर्वी शपथ घेतली आहे. आता येत्या काही दिवसांनी मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे.
मात्र मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याआधीच लाडकी बहीण योजनेच्या निकषावरून विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात काढलेल्या रॅलीत आमदार नितेश राणे यांनी फक्त 2 अपत्य असणाऱ्या महिलांनाचं याचा लाभ मिळायला हवा अशा आशयाचे विधान केले आहे.
नितेश राणे या संदर्भात बोलतांना म्हणालेत की, आम्ही लवकरच या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहोत. लाडकी बहीण योजनेत बदल करावेत, आदिवासी बांधवांना सूट द्या आणि २ अपत्य असणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ द्या असे निकष या योजनेत टाका.
हा फक्त ट्रेलर आहे जेव्हा हिंदू समाज पूर्ण पिक्चर दाखवेल तेव्हा तुम्हाला तुमचा अब्बा आठवेल असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुस्लीम समाजाला टार्गेट केले आहे. महत्त्वाची बाब अशी की, शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी सुद्धा अप्रत्यक्ष रीत्या याला समर्थन दाखवले आहे.
२ पेक्षा अधिक अपत्य असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळावं अशी मागणी राणे यांनी केली आहे. महाराष्ट्रातून ही मागणी पुढे येतेय, त्याबाबत पक्षातील आणि महायुतीचे नेते योग्य तो निर्णय घेतील असे मत शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
यामुळे पुन्हा एकदा लाडकी बहीण योजना केंद्रस्थानी आली असून यासंदर्भात खरच असा काही निर्णय घेतला जाणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.