Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लवकरचं देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून न्यू इयरचे गिफ्ट दिले जाणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. याच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना आतापर्यंत पाच महिन्यांचे पैसे मिळालेले आहेत.
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले असून आता महिलांना पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधीच या योजनेच्या पात्र महिलांना पाच महिन्यांचे पैसे मिळाले होते.
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर या योजनेच्या पुढील हफ्त्याचे पैसे वितरित होणे अपेक्षित होते. मात्र सत्ता स्थापनेसाठी मोठ्या प्रमाणात विलंब झाला आणि यामुळे डिसेंबरचे पैसे आता लांबणीवर पडले आहेत.
नागपूर येथे नुकत्याच काही दिवसांपूर्वी संपन्न झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपले की लगेचच लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा होणार असे संकेत दिले होते.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी देखील असेच विधान केले होते. मात्र आता डिसेंबर महिना जवळपास संपण्यात आहे. यामुळे महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे कधी पर्यंत जमा होणार हा मोठा प्रश्न आहे.
दरम्यान सध्याची परिस्थिती पाहता देवेंद्र फडणवीस सरकार नवीन वर्षाचे गिफ्ट म्हणून नववर्षाच्या सुरुवातीला किंवा 31 डिसेंबरला पात्र महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा करू शकते असा दावा केला जातोय.
यामुळे डिसेंबर महिन्याचे पैसे जानेवारीमध्ये मिळणार की डिसेंबरच्या शेवटीच मिळणार ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दुसरीकडे काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये सरकारकडून डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे सोबतच महिलांच्या खात्यात जमा केले जातील असेही म्हटले गेले होते.
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकार डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे एकाचवेळी पात्र महिलांच्या खात्यात जमा करू शकते असा दावा प्रसारमाध्यमांमध्ये करण्यात आला होता. यामुळे महिलांना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे सोबतच मिळणार का ही गोष्ट देखील पाहण्यासारखी ठरणार आहे.