Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अजून ज्यांनी अर्ज केलेले नसतील त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली महाराष्ट्र राज्य शासनाची एक महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत.
म्हणजे एका पात्र महिलेला वार्षिक 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. यासाठी राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला पात्र ठरणार आहेत. 21 ते 65 वर्षे वयोगटातील अन वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र असतील.
या योजनेचे पैसे 17 ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनाच्या आधीच महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. 17 तारखेला जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यावर जमा केले जातील.
आतापर्यंत एक कोटी 35 लाख महिला यासाठी पात्र ठरल्या आहेत. म्हणजे एवढ्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत. आता या महिलांना 17 तारखेला लाभ मिळणार आहे. यासाठी एक जुलैपासून अर्ज केले जात आहेत.
तसेच सरकारने 31 ऑगस्ट ही अर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत असल्याचे सांगितले होते. 31 ऑगस्टपर्यंत ज्या महिला अर्ज करतील आणि त्यांचे अर्ज पात्र ठरतील अशा पात्र महिलांना जुलै महिन्यापासून लाभ मिळणार आहे.
यामुळे अनेकांच्या माध्यमातून जर 31 ऑगस्ट नंतर महिलांनी अर्ज केला तर त्यांना लाभ मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
दरम्यान, आता याच संदर्भात राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर सुरूच राहणार आहे.
त्यांनी 31 ऑगस्टनंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार अशी मोठी माहिती दिली आहे. यामुळे, ज्या महिलांना ऑगस्ट अखेर पर्यंत अर्ज करता येणार नाही अशा महिलांना सुद्धा या निर्णयाचा फायदा होणार आहे.