Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात गाजली आणि राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय योजना म्हणून या योजनेकडे पाहिले जात आहे. या योजनेच्या जोरावर पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार आले, या योजनेतून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.
जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळत असून विधानसभा निवडणुकीच्या आधीच या योजनेचे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे वितरित करण्यात आले होते.
विधानसभा निवडणुकीच्या आधी या योजनेचे पाच महिन्यांचे साडेसात हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने राज्यात पुन्हा एकदा आमचे सरकार आले तर या योजनेचा पैसा वाढवला जाईल असे आश्वासन दिले होते.
महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपयाऐवजी 2100 रुपये देऊ अशी ग्वाही दिली होती. आता राज्यात महायुतीचे सरकार आले आहे, महायुतीचे सरकार आल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
यामुळे आता निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेले आश्वासन कधी पूर्ण होणार, लाडक्या बहिणींना 2100 रुपये केव्हापासून मिळणार ? हा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपये हप्त्याबाबत अहिल्यानगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
त्यांनी या योजनेतील पात्र महिलांना 2100 रुपये कधीपासून मिळणार ? याची माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींना मार्च महिन्यापासून 2,100 रुपयांचा लाभ मिळणार अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. ते नेवासा येथे बोलत होते.
माध्यमांशी संवाद साधतांना विखे पाटील म्हणालेत की, मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींचा हफ्ता ₹1500 वरुन ₹ 2100 केला जाईल. मार्च महिन्यात अर्थसंकल्प सादर होणार असून यानंतर लाडक्या बहिणींना आश्वासनाप्रमाणे 2100 रुपये मिळणार आहेत. 3 मार्च 2025 रोजी राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची रक्कम 2100 रुपये करण्याबाबतचा निर्णय होणार असे म्हटले जात आहे. यावेळी विखे पाटील यांनी काँग्रेस आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली.
ते म्हणालेत की, लोकसभेवेळी राहुल गांधी यांनी प्रत्येक महिलेला 6 महिन्यात खटाखट पैसे देऊ असे आश्वासन दिले होते. दिले का? नाही. ते असेच खोटी आश्वासने देत असतात. यामुळेच त्यांना जनतेनं नाकारलं आहे. पण आम्ही आमचं सरकार आल्यावर खटाखट नाही तर पटापट पैसे देऊ असे म्हटले होते.
ते आम्ही पटापट दिलेत. सरकार आल्यावर पैसे मिळाले की नाही ? आमचे सरकार खटाखट नाही तर पटापट देणारं आहे, अशीही टीका विखे पाटील यांनी केली आहे. एकंदरीत लाडक्या बहिणींना मार्च महिन्यापासून 2100 रुपयांप्रमाणे पैसे मिळणार आहेत, नक्कीच नव्या वर्षात महिलांसाठी ही एक मोठी भेट ठरणार आहे.