Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या अंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झाली आहे. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे देखील पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एका पात्र महिलेला 7500 मिळालेले आहेत. महत्त्वाची बाब अशी की डिसेंबर महिन्याचे पैसे देखील लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची बातमी हिवाळी अधिवेशनातून समोर आली आहे. खरे तर या योजनेसाठी हिवाळी अधिवेशनात तब्बल 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे या योजनेचा पुढील हप्ता मिळण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता हा हिवाळी अधिवेशन संपले की लगेचच महिलांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती देखील राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला संबोधित करताना दिली आहे.
दुसरीकडे काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचा हप्ता सोबतच पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल असाही दावा केला जातोय. मकर संक्रांति सणाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकार डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये सोबतच महिलांच्या खात्यात जमा करू शकतात असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.
दुसरीकडे या योजनेच्या माध्यमातून महिलांना 2100 रुपये देऊ अशी जी ग्वाही महायुतीने दिलेली आहे याची अंमलबजावणी ही पुढील वर्षात होणार आहे. फडणवीस यांनी याबाबतचा निर्णय हा येत्या अर्थसंकल्पात होईल असे सांगितले आहे. पण, महायुतीला प्रचंड मोठं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निकषाबाहेरील नावं वगळण्याचे संकेत दिले होते.
त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा सहावा हप्ता खात्यावर येणार की नाही? हा प्रश्न लाडक्या बहिणींना सतावत आहे. दरम्यान आज आपण लाडकी बहीण योजनेच्या यादीत महिलांनी आपले नाव कसे शोधायचे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
लाडकी बहिण योजनेच्या यादीमध्ये नाव शोधण्याची सोपी पद्धत !
लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये नाव शोधायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये नारीशक्ती दूत हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे. https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot या लिंक वर जाऊन तुम्ही हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकता. नंतर तुम्हाला नारीशक्ती दूत हे ॲप्लिकेशन उघडायचे आहे आणि त्यामध्ये लॉगिन करायचे आहे.
एप्लीकेशन ओपन झाले की तुम्हाला तिथे डॅशबोर्ड वर लाभार्थी अर्जदारांची यादी असा पर्याय दिसणार आहे. तुम्हाला या लाभार्थी अर्जदारांची यादी या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यात आपलं गाव, ब्लॉक, तालुका आणि जिल्हा निवडून शोधा बटणावर क्लिक करा. एवढे केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये आहे की नाही याबाबत माहिती मिळणार आहे.