Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. म्हणजेच एका वर्षात पात्र महिलेला 18000 रुपयाचा लाभ मिळणार आहे.
या योजनेसाठी राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला पात्र ठरणार आहेत. विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे. कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील याच्या लाभासाठी पात्र राहणार आहे.
अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ दिला जाणार आहे. फक्त महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळेल. ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला आहे मात्र ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिला देखील याच्या लाभासाठी पात्र ठरतील.
लाडकी बहीण योजनेच्या दीड कोटीहून अधिक पात्र लाभार्थ्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे सुद्धा मिळाले आहेत. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सप्टेंबर महिन्याचे पैसे देखील मिळणार आहेत.
ज्यांना आधीचे पैसे मिळालेले नाहीत त्यांनाही या शेवटच्या आठवड्यात पैसे दिले जाणार आहेत. खरंतर महाराष्ट्रातील ही लाडकी बहीण योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू झाली आहे. दरम्यान आता मध्य प्रदेश राज्य सरकारने तेथील योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत.
त्यामुळे महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या नियमातही बदल होणार की काय अशी भीती आता राज्यातील महिलांना भेडसावू लागली आहे. दरम्यान आता आपण मध्यप्रदेश मध्ये सुरू असणाऱ्या लाडली बहना योजनेच्या नियमात कोणते बदल झाले आहेत हे आता आपण समजून घेणार आहोत.
लाडली बहना योजनेचे नवीन नियम
ज्या महिलांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही.
अविवाहित महिला लाडली बहन योजनेसाठी अर्ज करू शकत नाही.
ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे ते देखील योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत.
ज्या कुटुंबात आजी किंवा माजी खासदार, आमदार आहेत किंवा कोणतेही सरकारी पद धारण करत आहेत अशा कुटुंबातील महिला देखील लाडली बहन योजनेसाठी पात्र नाहीत.
कोण पात्र राहणार?
21 ते 60 वयोगटातील मध्य प्रदेशची रहिवासी महिला लाडली बहना साठी पात्र राहील.
कोणत्याही प्रवर्गातील महिला याचा लाभ घेऊ शकते.
अर्जदार स्वत: किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरणारा नसावा.
ज्यांच्या कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा कमी जमीन आहे त्या महिला या योजनेसाठी पात्र असतील.