Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारने अलीकडेच जाहीर केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. यासाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे एका पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील आणि अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला यासाठी पात्र ठरणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील एका अविवाहित महिलेला देखील याचा लाभ मिळणार आहे. याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या महिलांना दिला जाणार आहे.
परंतु ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला असेल आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले असेल अशा महिला देखील याच्या लाभासाठी पात्र ठरवल्या जाणार आहेत. यासाठी एक जुलैपासून अर्ज भरले जात असून 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले होते आणि ज्यांचे या कालावधीतील अर्ज मंजूर झाले आहेत अशा पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपये शिंदे सरकारकडून देण्यात आले आहेत.
अशातच आता या योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत अपात्र असूनही ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे अशा महिलांकडून आता या योजनेच्या पैशांची वसुली केली जाणार आहे.
ज्या महिलांना आधीच संजय गांधी निराधार योजनेसारख्या सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे आणि अशा महिलांनी जर लाडकी बहिण योजनेचा देखील लाभ घेतलेला असेल तर आता अशा महिलांकडून लाडकी बहिण योजनेचे पैसे परत घेतले जाणार आहेत.
एकंदरीत सरकारी योजनांचा दुहेरी लाभ घेणाऱ्या महिलांकडून हे पैसे वसूल केले जाणार आहेत. खरे तर ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनांच्या माध्यमातून आधीच आर्थिक सहाय्य मिळत आहे अशा महिला यासाठी अपात्र ठरतात.
पण अशा अपात्र महिलांकडून लाडकी बहिण योजनेचा लाभ उचलला असल्याचे प्रकार राज्यातील वेगवेगळ्या भागांमधून समोर आले आहेत. यामुळे आता अशा अपात्र महिलांकडून या योजनेचे पैसे वसूल केले जाणार आहेत. दुसरीकडे, काही लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झाल्यानंतर बँकांच्या माध्यमातून मिनिमम बॅलन्स मेंटेन केला नसल्याने रक्कम कपात करण्यात आली आहे.
तसेच काही प्रकरणांमध्ये कर्जाच्या थकीत हप्त्यांमध्ये ही रक्कम वळवण्यात आली आहे. म्हणजेच या योजनेचे पैसे मिळूनही प्रत्यक्षात काही लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळू शकलेला नाही. लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून कोणत्याही प्रकारे पैसे कापू नका, अशी सूचना महिला व बाल विकास विभागाने दिली होती.
सर्व बँकांना याबाबतची सूचना मिळालेली आहे. पण, तरीही अनेक ठिकाणी पैसे कापणे सुरूच असून तशा तक्रारी राज्यातील अनेक भागांमधून समोर येत आहेत. यावर उपाय म्हणून आता महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून थेट आरबीआयला पत्र पाठवले जाणार आहे. आता थेट आरबीआय कडे ज्यांचे पैसे कापले गेले आहेत त्यांना बँकांनी पुन्हा पैसे परत करावेत अशी विनंती केली जाणार आहे.