Ladki Bahin Yojana News : भारतीय निवडणूक आयोग येत्या दोन-तीन दिवसात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. दरम्यान, याच आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून शिंदे फडणवीस पवार सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात आचार संहिते पूर्वीच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत या योजनेची चर्चा आहे. चर्चेचे कारण असे की, या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना प्रत्येक वर्षाला 18,000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना आत्तापर्यंत पाच हप्त्यांचा लाभ मिळाला सुद्धा आहे. या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील आणि अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांची भेट दिली जात आहे.
आत्तापर्यंत या योजनेचे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात वर्ग झाले आहेत. या योजनेसाठी 30 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची मुदत होती.
मात्र अनेकांना या मुदतीत अर्ज सादर करता आले नाहीत यामुळे या योजनेला मुदतवाढ दिले गेले पाहिजे अशी मागणी कुठे ना कुठे महिलांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून जोर धरत होती.
दरम्यान याच मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिंदे फडणवीस पवार सरकारने आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून योजनेला मुदतवाढ देण्याचा एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी सुरुवातीला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली होती. नंतर एका महिन्याची मुदत वाढवण्यात आली.
ही मुदत 30 सप्टेंबर झाली. यानंतर आता पुन्हा एकदा या योजनेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता या योजनेसाठी 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
मात्र हे अर्ज फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकांकडे भरले जाणार आहेत. म्हणजे ज्या महिलांनी या योजनेसाठी अजून अर्ज केलेला नसेल त्यांना त्यांच्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे जाऊन या योजनेसाठी अजूनही अर्ज करता येणार आहे.