Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या अर्जदार महिलांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. एमपी राज्य सरकारच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट यादरम्यान जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये दिले गेले आहेत.
ज्या महिलांनी जुलैमध्ये अर्ज केला होता त्यांना पहिल्या टप्प्यात पैसे मिळाले आहेत. मात्र ज्यांनी ऑगस्टमध्ये अर्ज केला आहे त्या महिलांना कधीपर्यंत पैसे मिळणार हा मोठा यक्षप्रश्न उपस्थित केला जात होता.
दरम्यान आता याच संदर्भात सरकारकडून एक मोठी अपडेट समोर आली आहे. ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना पैसे कधी पर्यंत मिळणार याची थेट तारीख सरकारने जाहीर केली आहे. लाडकी बहीण योजना महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून राबवली जात आहे.
दरम्यान आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेसाठी 1 ऑगस्ट पासून जे अर्ज आले आहेत त्याचा निधी 31 ऑगस्टपासून वितरीत होणार अशी माहिती दिली आहे. काल, माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम उपराजधानी नागपूरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात ज्या महिलांनी 1 ऑगस्ट पासून या योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत त्यांना पैसे मिळणार आहे. सध्या स्थितीला ज्यांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केले होते त्या सर्व अर्जाची छाननी सुरु आहे.
पहिल्या टप्प्यात एक कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात किती महिलांना लाभ मिळणार हा देखील प्रश्न आहे. मंत्री महोदय यांनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यात राज्यातील जवळपास 45-50 लाख पात्र महिलांना याअंतर्गत पैसे मिळणार आहेत.
कशी आहे योजना
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतीच सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. अर्थातच एका महिलेला एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.
याचा राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना लाभ मिळणार आहे. 21 ते 65 वर्षे वयोगटातील आणि अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ दिला जाणार आहे. कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील यासाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार आहे.