Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे स्थगित करण्यात आलेली लाडकी बहिण योजना पुन्हा एकदा सुरू झाली आहे. लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासं सुरुवात झालीये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अलीकडे सुरू करण्यात आलेली महायुती सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना. या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात.
आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण पाच हफ्ते म्हणजेच जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे खात्यात जमा करण्यात आले आहेत. अन सहावा हप्ता दोन दिवसांपासून महिलांच्या खात्यात जमा होत आहे.
डिसेंबर अखेरपर्यंत या योजनेचा सहावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळतोय. नवीन वर्ष सुरू होण्याआधीच या योजनेचा पैसा महिलांच्या खात्यात जमा होत असल्याने महिलांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
अशातच आता या योजने संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. फडणवीस सरकारमधील मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या काही महिलांना 9000 रुपये मिळतील अशी घोषणा केली आहे. खरंतर लाडकी बहीण योजनेचा लाभ हा ज्या लाभार्थ्यांनी आधार सीडींग म्हणजेच बँक खात्यासोबत आधार लिंक केले आहे त्यांनाचं दिला जातोय.
दरम्यान, अनेक महिलांनी जुलै ऑगस्ट मध्ये अर्ज केले होते, पण त्यांनी बँक खात्यासोबत आधार लिंक केले नसल्याने त्यांना या योजनेचा पैसा मिळालेला नाही. म्हणजेच अशा महिलांना अर्ज मंजूर होऊनही पैसे मिळाले नाहीत. यामुळे या लाभार्थ्यांना आधार सीडींग केल्यानंतर पैसे मिळणार का? हा प्रश्न मंत्री अदिती तटकरे यांना विचारण्यात आला.
त्यावर त्या म्हणाल्या की, आम्ही सुरुवातीपासून जाहीर केले होते की जुलै आणि ऑगस्ट मध्ये ज्या महिलांनी अर्ज दाखल केलायं अन ज्यांचे अर्ज मान्य झालेले आहेत. त्यांना त्या दिवसापासूनचं पैसे दिले जाणार आहेत. त्यांना रजिस्ट्रेशन केलेल्या दिवसापासून लाभ मिळणार आहे.
म्हणजे ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज केलेले असतील आणि त्यांचे अर्ज मंजूर झालेले असतील पण आधार सीडींग मुळे पैसे मिळालेले नसतील तर त्यांना या महिन्यात जुलै महिन्यापासूनची रक्कम मिळणार आहे. म्हणजे अशा महिलांना एकूण 9000 रुपये दिले जाणार आहेत. मात्र यासाठी बँक खात्यासोबत आधार लिंक करणे आवश्यक राहणार आहे.