Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये म्हणजेच एका वर्षात 18 हजार रुपये दिले जाणार आहेत. यासाठी राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला पात्र ठरणार आहेत.
विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे. कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील याच्या लाभासाठी पात्र राहणार आहे. वार्षिक अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ पुरवला जाणार आहे.
ही योजना 28 जून 2024 पासून सुरू झाली असून या अंतर्गत दोन महिन्यांचे पैसे देखील पात्र महिलांच्या खात्यात वर्ग झाले आहेत. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एक कोटीहून अधिक महिलांना दोन महिन्यांचे पैसे मिळाले आहेत.
ज्या महिलांनी जुलैमध्ये अर्ज भरले होते त्या महिलांना या योजनेचे पैसे देण्यात आले आहेत. तसेच ज्यांनी ऑगस्टमध्ये अर्ज भरले आहेत त्यांना सप्टेंबर मध्ये या योजनेचे पैसे मिळणार आहेत. अशा महिलांना सप्टेंबर मध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तिन्ही महिन्यांचे 4500 रुपये मिळणार आहेत.
पण, जुलैमध्ये अर्ज भरलेल्या काही महिलांना पात्र असूनही म्हणजेच त्यांचा अर्ज मंजूर होऊनहीं या योजनेचे पैसे मिळालेले नाहीयेत. या अशा अर्ज मंजूर झालेल्या पण पैसे न मिळालेल्या महिलांना आपले आधार कार्ड बँक सोबत लिंक करावे लागणार आहे. ज्यांना या योजनेचे पैसे मिळालेले असतील त्यांना आता काहीच करावे लागणार नाही.
पण, जुलैमध्ये अर्ज केलेल्या अन अर्ज मंजूर झालेल्या ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट चे पैसे मिळालेले नसतील त्यांनी बँकेसोबत आधार लिंक करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आता आपण बँकेसोबत आधार कार्ड लिंक करण्याची प्रोसेस कशी आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक करण्याची प्रोसेस
बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक करायचे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम www.npci.org.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायचे आहे.
या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला होम पेजवर असणाऱ्या Consumer या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
मग तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल या नवीन पेजवर तुम्हाला Bharat Aadhaar Seeding Enabler या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज ओपन होईल हा अर्ज आधार सीडिंगचा असतो. यामध्ये तुम्हाला तुमचा बारा अंकी आधार क्रमांक, बँकेचे नाव, बँकेचा खाते क्रमांक आणि कॅप्चा कोडं टाकायचा आहे. यानंतर पुढे जा या बटणावर क्लिक करायचे आहे.
यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. यात तुम्हाला आधार कार्डसोबत नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP पाठवला जाईल, तुम्हाला तो OTP टाकावा लागेल आणि सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
मग, आधार कार्ड पडताळणीनंतर आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केले जाणार आहे.