Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. मध्यप्रदेश राज्य सरकारच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र जेव्हापासून ही योजना सुरू झाली आहे तेव्हापासून या योजनेत सातत्याने बदल केले जात आहेत. यामुळे या योजने संदर्भात सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. खरंतर या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत.
म्हणजेच एका पात्र महिलेला एका वर्षात 18000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे. 21 ते 65 वर्षे वयोगटातील आणि अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्रात जन्मलेल्या विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला यासाठी पात्र ठरतील.
महत्वाचे म्हणजे ज्या महिला परराज्यात जन्मलेल्या आहेत पण ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न गाठ बांधली आहे त्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी आतापर्यंत करोडोंच्या संख्येने अर्ज सादर झाले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज सादर केले होते आणि ज्यांचे अर्ज मंजूर झालेत त्यांना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे तीन हजार रुपये देऊ करण्यात आले आहेत. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या जवळपास दीड कोटीहून अधिक महिलांना निधी देण्यात आला आहे. मात्र अनेकांना अर्ज भरूनही अजून पर्यंत याचा पैसा मिळालेला नाही.
यामुळे आम्हाला पैसे कधी मिळणार हा मोठा यक्षप्रश्न अशा अर्जदारांकडून उभा केला जात आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार होते. पण या मुदतीत अनेकांना आपला अर्ज सादर करता आला नाही म्हणून याला मुदतवाढ मिळायला हवी अशी मागणी होती. त्यानुसार शिंदे सरकारने अर्ज करण्यास 30 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ दिलेली आहे.
म्हणजे तुम्ही जर या योजनेच्या लाभासाठी पात्र असाल आणि अजून यासाठी अर्ज केलेला नसेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. दरम्यान, काही महिलांच्या माध्यमातून या योजनेसाठी जॉइंट बँक अकाउंट चालणार का , सप्टेंबर चे पैसे आमच्या खात्यात कधी जमा होणार असे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आज आपण याच प्रश्नांचा आढावा घेणार आहोत.
जॉईंट बँक अकाउंट चालणार का?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी सुरू करण्यात आलेली योजना. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेचा वापर फक्त महिलांनीच केला पाहिजे असेच सरकारने ठरवले असून या अनुषंगाने स्वातंत्र बँक अकाउंट यासाठी ग्राह्य धरले जाणार आहे.
म्हणजेच जॉइंट बँक अकाउंट असेल तर असे बँक अकाउंट या योजनेच्या लाभासाठी चालणार नाही. यामुळे जर तुम्ही जॉइंट बँक अकाउंट अर्ज भरताना दिलेले असेल तर ताबडतोब तुमचा अर्ज दुरुस्त करून स्वातंत्र बँक अकाउंट खोलून ते बँक अकाउंट अपडेट करा. विशेष म्हणजे या योजनेसाठी पोस्टाचे खाते सुद्धा चालणार आहे. म्हणून जर तुमचे इंडियन पोस्टात अकाउंट असेल तर तुम्ही हे अकाउंट याला जोडू शकता.
सप्टेंबरमध्ये अर्ज केल्यास पैसे कधी पर्यंत मिळणार?
जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज केलेल्या अन अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना या दोन्ही महिन्यांचे पैसे वितरित करण्यात आले आहेत. जवळपास दीड कोटीहुन अधिक पात्र महिलांना याचा लाभ मिळाला आहे. मात्र ज्यांचे आधार कार्ड बँकेला लिंक नव्हते त्यांना अजून याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे अशा लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड बँकेला लिंक करावे अशा सूचना दिल्या गेल्या आहेत.
दरम्यान सप्टेंबर मध्ये अर्ज केलेल्या आणि अर्ज मंजूर झालेल्या महिलांना येत्या काही दिवसांनी या योजनेचा लाभ मिळणार आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या अन अर्ज मंजूर झालेल्या महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे 4500 रुपये दिले जाणार आहेत. तसेच ज्यांनी सप्टेंबर मध्ये अर्ज भरला असेल त्यांना सप्टेंबर पासून याचा लाभ मिळणार आहे. म्हणजे अशा महिलांना फक्त सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. याचा लाभ हा 19 सप्टेंबर पर्यंत वितरित होऊ शकतो असे म्हटले जात आहे.
म्हणजेच लाडकी बहिण योजनेचा पुढील हप्ता 19 सप्टेंबर पर्यंत मिळण्याची शक्यता आहे. तथापि, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेला असल्यास जुलै आणि ऑगस्ट चे पैसे मिळणार की नाही? यासंदर्भात सरकारकडून कोणतीच अधिकृत घोषणा झालेली नाही. यामुळे लाभार्थ्यांनी सरकारकडून होणाऱ्या अधिकृत घोषणेची वाट पहावी असे आवाहन केले जात आहे.