Ladki Bahin Yojana : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा सुरू आहे. गाव खेड्यापासून ते मंत्र्यांच्या एसी ऑफिस पर्यंत सर्वत्र याच योजनेविषयी बोलले जात आहे. मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेवरून विरोधक सरकारवर हल्ला चढवत आहेत तर सरकार स्वतःची पाठ थोपटत आहे.
दुसरीकडे या योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांची मोठी धावपळ होत आहे. योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी आणि योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांना तासंतास रांगेमध्ये उभे राहावे लागत आहे.
खरे तर या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून वार्षिक 18 हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.
यासाठी राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला पात्र ठरणार आहेत. विशेष म्हणजे कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील यासाठी अर्ज करू शकणार आहे.
वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला यासाठी पात्र ठरणार आहेत. या योजनेअंतर्गत जवळपास दोन ते अडीच कोटी महिलांना लाभ मिळणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे आत्तापर्यंत या योजनेसाठी एक कोटी 80 लाख अर्ज सादर झाले आहेत. यातील एक कोटी तीस लाख अर्ज ऑनलाईन पद्धतीने आणि उर्वरित पन्नास लाख अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करण्यात आले आहेत.
या योजनेसाठी एक जुलैपासून अर्ज भरण्याला सुरुवात झाली असून 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली आहे. पण याचा लाभ हा जुलै महिन्यापासूनच मिळणार आहे. म्हणजे ऑगस्टमध्ये अर्ज दाखल झाले असले तरी जुलै महिन्याचे पैसे मिळणार आहेत.
या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे 19 ऑगस्ट पर्यंत महिलांच्या खात्यावर जमा होतील अशी माहिती सरकारने दिली आहे. 19 ऑगस्टला रक्षाबंधनाचा मोठा सण आहे आणि याच दिवशी लाडक्या बहिणींना या योजनेचे पैसे मिळणार अशी शक्यता आहे.
खरेतर या योजनेअंतर्गत 19 ऑगस्टपर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये मिळणार आहेत. पण या आधी मात्र महिलांच्या खात्यावर एक रुपया जमा केला जाणार आहे. काही निवडक महिलांच्या खात्यावर हा एक रुपया जमा करण्यास सुरुवात देखील झाली आहे.
म्हणून सरकार १५०० रुपये महिना देणार होते तर खात्यात १ रुपया कसा आला? असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, आता याच संदर्भात राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे, पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात १ रुपया जमा केला जात आहे. हा १ रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.