Ladki Bahin Yojana : शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. यानंतर या योजनेचा जीआर निघाला. तेव्हापासूनच ही योजना राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत. यासाठी सध्या अर्ज प्रक्रिया सुरू आहे. एक जुलैपासून अर्ज स्वीकारले जात असून 31 ऑगस्ट ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची दिनांक आहे.
आतापर्यंत जवळपास दोन कोटी महिलांनी यासाठी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे 31 ऑगस्ट पर्यंत या संख्येत आणखी वाढ होणार आहे. या योजनेचे अर्ज नारीशक्ती दूत या एप्लीकेशन वर आणि वेबसाईटवर सादर केले जात आहेत.
या योजनेचा राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना लाभ दिला जाणार आहे. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला यासाठी पात्र ठरणार आहेत. वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
याचा लाभ फक्त राज्यातील महिलांना दिला जाणार आहे. परंतु ज्या महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल आणि जिने महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले असेल ती महिला देखील यासाठी पात्र राहणार आहे.
पण, या योजनेवरून महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये मोठे घमासान सुरू आहे. सत्ताधारी महायुती योजनेवरून स्वतःची पाठ थोपटत आहे तर महाविकास आघाडी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहे. एवढेच काय तर या योजने विरोधात जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली होती.
मुंबई उच्च न्यायालयात या योजनेच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र माननीय उच्च न्यायालयाने ही योजना कल्याणकारी योजना शासनाच्या धोरणात्मक निर्णयात ढवळाढवळ करू शकत नाही असा निर्णय दिला आहे.
म्हणजेच जनहित याचिका फेटाळली गेली आहे. अर्थातच महाराष्ट्रात ही योजना सुरू राहणार आहे. दरम्यान आता या योजने संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी एक मोठे विधान केले आहे. अजित पवार यांनी आपल्या एक्स हँडल वर एक पोस्ट शेअर करत या योजनेबाबत एक सूचक विधान केलं आहे.
अजित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणालेत की, लाडकी बहीण योजना टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष बोलत आहेत. परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे. तोच माझा स्वाभिमान आहे. ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे, तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे कारण, ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचे भाकित आहे.
परंतु येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देवून या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. अर्थातच अजितदादांनी भविष्यात या योजनेच्या रकमेत वाढ होईल असे म्हटले आहे. यामुळे आता पुन्हा एकदा या योजनेची चर्चा सुरू झाली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेअंतर्गत 19 ऑगस्ट पर्यंत म्हणजेच रक्षाबंधनाच्या आधी पात्र महिलांना लाभ दिला जाणार आहे. पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे 19 ऑगस्ट पर्यंत दिले जाणार आहेत. यामुळे राज्यातील महिलांसाठी हे रक्षाबंधनचे एक मोठे गिफ्ट ठरणार आहे.