Ladki Bahin Yojana : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली असून महिलांची मोठी गर्दी होत आहे. यासाठी एक जुलैपासून अर्ज भरले जात असून 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत.
म्हणजेच एका वर्षात पात्र महिलांना 18 हजार रुपये दिले जाणार आहेत. या योजनेसाठी राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या, निराधार महिला पात्र ठरणार आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील महिलांना मिळणार आहे.
तसेच परराज्यात जन्म झालेल्या मात्र महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह करणाऱ्या महिला देखील यासाठी पात्र ठरणार आहेत.
21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळेल. वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिला यासाठी पात्र ठरतील.
ट्रॅक्टर वगळता चार चाकी वाहन असेल तर मात्र अशा कुटुंबातील महिला यासाठी अपात्र राहतील. ही योजना मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा रोख लाभ हा पुढील महिन्यात मिळणार असा अंदाज आहे.
मात्र असे असले तरी ही योजना जुलै महिन्यापासून लागू असल्याने महिलांना जुलै महिन्याचा देखील हप्ता मिळणार आहे. दरम्यान या योजनेसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी मोठी माहिती दिली आहे.
या योजनेचा पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता महिलांच्या खात्यावर कधीपर्यंत जमा होणार या संदर्भात गडचिरोलीतील एका खाजगी कंपनीच्या पायाभरणीच्या कार्यक्रमादरम्यान अजित पवारांनी मोठी माहिती दिली.
अजितदादा यांनी सांगितल्याप्रमाणे या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन रक्षाबंधन सणापूर्वी एकत्रित रित्या पात्र ठरणाऱ्या महिलांना दिला जाणार आहे. हा लाभ पात्र महिलांच्या थेट बॅंक खात्यावर जमा केला जाणार आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संदर्भात माहिती दिली आहे. फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे, 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान या योजनेचा पहिला हप्ता देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
तसेच, ज्यांचे अर्ज 31 ऑगस्टपर्यंत येतील, त्यांचे अर्ज जुलैमध्ये आले असं समजून त्यांनाही त्याच्या पुढच्या महिन्यात जुलै आणि ऑगस्टचे पैस आम्ही देणार आहोत. त्यामुळं कोणाचेही नुकसान होणार नसल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे.