Ladki Bahin Yojana : आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. म्हणजेच एका पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.
या योजनेसाठी सुरुवातीला 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्यास मुदत देण्यात आली होती. मात्र नंतर ही मुदत वाढवण्यात आली आणि आता 30 सप्टेंबर पर्यंत पात्र महिलांना अर्ज सादर करता येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा प्रत्यक्षात लाभ सुद्धा मिळू लागला आहे.
राज्यातील जवळपास दीड कोटीहून अधिक पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये मिळाले आहेत. एवढेच नाही तर या योजनेचा तिसरा हप्ता देखील आता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. कालपासून या योजनेचा तिसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
सप्टेंबर महिन्याचे पैसे 23 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या काळात जमा केले जाणार आहेत. मात्र अनेक महिलांच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत ज्यांना सुरुवातीच्या दोन महिन्यांचे पैसे मिळालेले नाहीत त्यांना 4500 रुपये मिळणार का असा सवाल उपस्थित केला जातोय.
दरम्यान आता याच संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी माहिती दिली आहे. तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत आणि ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत मात्र ज्यांना अजून याचा लाभ मिळालेला नाही अशाच महिलांना फक्त 4500 रुपये मिळणार आहेत.
मात्र ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला असेल त्यांना आधीच्या दोन महिन्यांचे पैसे मिळणार नाहीत. अशा महिलांना फक्त सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळणार आहेत. तसेच ज्या महिलांना आधीच दोन हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत त्यांना देखील सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळणार आहेत.
कशी आहे लाडकी बहिण योजना?
लाडकी बहीण योजना ही मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू झाली आहे. मध्यप्रदेश मध्ये सुरू असणाऱ्या लाडली बहना योजनेअंतर्गत तेथील पात्र महिलांना दरमहा बाराशे रुपये दिले जात आहेत. मात्र आपल्या राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.
राज्यातील या योजनेसाठी 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला पात्र ठरणार आहेत. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिला यासाठी पात्र ठरणार आहेत. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील यासाठी पात्र ठरणार आहे. याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना मिळणार आहे. मात्र ज्या महिलांचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला असेल आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले असेल अशा महिला सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरतील.