Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्य शासनाने मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील आणि अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला यासाठी पात्र राहणार आहेत.
राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे. कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील याच्या लाभासाठी पात्र ठरणार हे विशेष. सुरुवातीला या योजनेचे अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली होती.
मात्र आता ही मुदत सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. यासाठी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. मात्र ज्या महिला सप्टेंबर मध्ये अर्ज भरतील त्यांना या योजनेचे पैसे कधी मिळणार? हा प्रश्न अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
यासंदर्भात आता राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहिण योजनेसाठी आतापर्यंत जवळपास दोन कोटी ४० लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत.
यापैकी जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी सात लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच ३१ ऑगस्टला तब्बल ५२ लाख महिलांना या योजनेचे पैसे वितरित करण्यात आले आहेत.
सप्टेंबरमध्ये आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत, त्या अर्जांची छाननी सुरु आहे. तसेच सप्टेंबर मध्ये अजूनही लाखो अर्ज येणार आहेत. तेव्हा त्या अर्जाची छाननी पूर्ण झाल्यानंतर दोन कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील अशी माहिती मंत्री महोदयांनी दिली आहे.
तटकरे यांनी सरकार अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ देणार अशी माहिती दिली आहे. ज्या पात्र महिलांना योजनेचा लाभ ऑगस्ट महिन्यात मिळाला आहे, त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा लाभ वितरीत केला जाणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज भरले आहेत. त्यांना देखील या महिन्यापासूनच लाभ दिला जाणार आहे. अर्थातच सप्टेंबर मध्ये अर्ज केलेल्या महिलांना देखील लवकरच या योजनेचे पैसे मिळणार आहेत.