Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्य शासनाने मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेतुन राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. म्हणजेच एका वर्षात एका पात्र महिलेला 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. यासाठी एक जुलैपासून अर्ज भरले जात असून 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
या योजनेचा लाभ हा 17 ऑगस्टला दिला जाणार आहे. 17 ऑगस्टला या योजनेच्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार आहेत. म्हणजेच या दिवशी पात्र ठरणाऱ्या महिलांना तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.
आतापर्यंत या योजनेसाठी राज्यातील दीड कोटी महिलांनी अर्ज सादर केले असून अर्जाचा हा आकडा आणखी वाढणार आहे. या योजनेमुळे राज्यातील गरजवंत महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहेत.
ही योजना जुलै 2024 पासून सुरू झाली असून कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. येत्या रक्षाबंधनाच्या आधीच म्हणजेच १७ ऑगस्ट रोजी पात्र महिलांच्या बॅंक खात्यात जुलै, ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरित करण्यात येतील.
तसेच यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाचवेळी तीन महिन्यांचे साडेचार हजार रूपये दिले जाणार आहेत. म्हणजेच 17 ऑगस्ट नंतर जे अर्ज मंजूर होतील त्या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे एकाच वेळी दिले जाणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. काल धुळे जिल्ह्यातील साक्री येथे महिला सक्षमीकरण मेळाव्यात महिला-भगिंनीना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली.
कोणाला मिळणार लाभ ?
लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना मिळणार आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला यासाठी पात्र राहतील. वार्षिक अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांसाठी पात्र असतील. फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच याचा लाभ मिळणार आहे.
परंतु ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिला देखील यासाठी पात्र ठरतील. पण ट्रॅक्टर वगळता इतर चार चाकी वाहन नावावर असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे.