Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने अलीकडेच जाहीर केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारची ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
छत्रपती संभाजी नगर मध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेअंतर्गत दिले जाणारे अर्थसहाय्य वाढवले जाणार अशी घोषणा केली आहे. सध्या या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.
म्हणजेच पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना तीन हप्ते म्हणजेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे 10 ऑक्टोबर पर्यंत या योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे दिले जाणार आहेत.
स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच याबाबत माहिती दिली आहे. असे असतानाच आता, ‘तुम्ही आमची ताकत वाढवा, दीड हजाराचे 2 हजार करणार, 2 हजाराचे अडीच हजार करणार, अडीच हजाराचे 3 हजार करणार.
तुम्हाला आम्हाला लखपती झाल्याचे पाहायचे आहे. ज्या दिवशी सगळ्या बहिणी लखपती होतील, त्या दिवशी समाधानाचा दिवस असेल,’ असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
अर्थातच पुढेही महायुतीचे सरकार कायम राहिले तर लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देऊ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. खरंतर आज छत्रपती संभाजी नगर मध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ वचनपूर्ती सोहळा पार पडला.
या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधान केले आहे.
कशी आहे योजना ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळतात. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळतो.
अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना या अंतर्गत लाभ दिला जात आहे. राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्याक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळतोय. कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील यासाठी पात्र ठरणार आहे.
याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना मिळतोय मात्र ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिलांना देखील याचा लाभ दिला जाणार आहे.