Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने मध्यप्रदेश राज्य सरकारच्या धर्तीवर ही योजना राज्यात सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या या योजनेअंतर्गत राज्यातील विवाहित, घटस्फोटीत, परित्यक्त्या, विधवा निराधार महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत.
म्हणजेच एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी एक जुलैपासून अर्ज स्वीकारले जात आहेत आणि पात्र महिलांना 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या योजनेसाठी अर्ज सादर करता येणार आहेत. या योजनेचे पैसे पुढल्या महिन्यात महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.
मात्र ही योजना जुलै महिन्यापासून राबवली जात असल्याने जुलै महिन्याचे देखील पैसे राज्यातील महिलांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला यासाठी पात्र ठरणार आहेत. वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांसाठी पात्र ठरतील.
ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनांच्या माध्यमातून पंधराशे रुपयांपर्यंतचा लाभ मिळत नाही अशा महिला यासाठी पात्र राहतील. ट्रॅक्टर वगळता चार चाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना मात्र याचा लाभ मिळणार नाही.
या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळणार असल्याने सध्या महाराष्ट्रात या योजनेची मोठी चर्चा आहे. या योजनेसाठी अर्ज करणे हेतू महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात धावपळ सुरु आहे. दरम्यान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्य सरकार नंतर केंद्रातील मोदी सरकार देखील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करणार असा दावा मीडिया रिपोर्ट मधून समोर आला आहे.
खरे तर 23 जुलै 2024 ला मोदी सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण बजेट सादर करणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी हा अर्थसंकल्प संसदेत मांडणार आहेत. यावेळी केंद्रातील सरकार अर्थसंकल्पात महिलांसाठी महत्त्वाच्या घोषणा करू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र यांसारख्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीला फटका बसला असल्याने सरकार महिला मतदारांना खुश करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय या बजेटमध्ये घेऊ शकते असा दावा केला जात आहे.
मोदी सरकार मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य शासनप्रमाणे संपूर्ण देशातील महिलांसाठी लाडली बहना योजना आणू शकते असे बोलले जात आहे. मध्य प्रदेश राज्य सरकार महिलांना लाडली बहन योजनेअंतर्गत दरमहा 1,250 रुपये देत आहे.
दुसरीकडे आपले महाराष्ट्र राज्य सरकार महिलांना या योजनेअंतर्गत दर महिन्याला पंधराशे रुपये देणार आहे. आता केंद्र सरकार देखील अशीच योजना संपूर्ण देशात आणू शकते असा दावा होत आहे. केंद्र सरकार अर्थसंकल्पात या योजनेबाबत घोषणा करणार असा अंदाज आहे.
23 जुलै रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात महिलांसाठी लाडकी बहीण योजनेसारखी दुसरी योजना केंद्र सरकार आणू शकते, अशी अपेक्षा आहे. तसेच आगामी अर्थसंकल्पात सरकार आयकरदाते, शेतकरी, तरुण वर्गासाठी काही मोठ्या घोषणा करू शकते असे बोलले जात आहे.