Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी हाती आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपासून अर्थातच 14 ऑगस्ट च्या सायंकाळपासून लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरवात झाली आहे. जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होत आहेत.
यामुळे सध्या या योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण असून सर्वत्र शिंदे सरकारच्या या योजनेचे कौतुक केले जात आहे. खरंतर महाराष्ट्रात दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. भारतीय निवडणूक आयोगाकडून तसेच संकेत प्राप्त झालेत.
दिवाळीनंतर प्रत्यक्षात विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. यामुळे आता सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून लाडकी बहिण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जात आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने संदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे. महाराष्ट्र राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी योजने संदर्भात माहिती दिली आहे. मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ हस्तांतरण करण्याची प्रक्रिया निरंतरपणे सुरू आहे.
आज सकाळपासून १६ लाख ३५ हजार भगिनींच्या खात्यात ३००० रुपये लाभ जमा झाला आहे. त्यापूर्वी ८० लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण पूर्ण झाले होते. सद्यस्थितीत एकूण ९६ लाख ३५ हजार महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ यशस्वीरित्या हस्तांतरित झाला आहे.
उर्वरित महिलांनाही लवकरच लाभ मिळावा यासाठी महिला व बालकल्याण विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे. शिंदे सरकार रक्षाबंधनाच्या आधीच या योजनेचा पात्र महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा करणार आहेत. त्यामुळे उर्वरित महिलांना 19 ऑगस्टपर्यंत या योजनेचे पैसे मिळतील अशी आशा आहे.
कशी आहे योजना?
लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर सुरू झाली आहे. या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. म्हणजेच एका महिलेला एका वर्षात 18000 रुपयाचा लाभ मिळणार आहे.
विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला यासाठी पात्र ठरणार आहेत. वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला याच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत.
याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना मिळणार आहे. पण ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिला देखील यासाठी पात्र ठरतील.