Konkan Railway Passengers : दिवाळीचा सण आता मात्र सात दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा 10 नोव्हेंबरपासून दिवाळी सण सुरू होणार आहे. यावर्षी 10 नोव्हेंबरला धनत्रयोदशी, 11 नोव्हेंबरला दीपावली, लक्ष्मी कुबेर पूजन, 14 नोव्हेंबरला दीपावली पाडवा बलिप्रतिपदा आणि 15 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी केली जाणार आहे.
म्हणजेच 10 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत यंदा दिवाळीचा सण राहणार आहे. दरम्यान या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.
खरंतर, दिवाळीच्या सणाला रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढते. दरवर्षी या सणासुदीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते.
अशा परिस्थितीत, दिवाळी सणाला होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचे जाहीर केले आहे. उधना ते मंगळूर दरम्यान ही गाडी चालवली जाणार आहे. 3 नोव्हेंबर 2023 अर्थातच आज पासून ही विशेष ट्रेन चालवली जाणार आहे.
ही गाडी एक जानेवारी 2024 पर्यंत चालवली जाणार आहे. ही गाडी द्विसाप्ताहिक राहणार आहे म्हणजेच आठवड्यातून दोनदा ही गाडी धावेल.
उधना ते मंगळूर ही गाडी आज पासून 31 डिसेंबर 2023 पर्यंत चालवली जाणार आहे आणि मंगळूरु ते उधना ही गाडी चार नोव्हेंबर पासून म्हणजे उद्यापासून चालवली जाणार आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, करमाळी, मडगाव जं., कानाकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
म्हणजेच ही गाडी कोकणातील रहिवाशांसाठी विशेष खास ठरणार आहे. दिवाळीच्या काळात कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास यामुळे जलद आणि आरामदायी होणार असा आशावाद व्यक्त होत आहे.