Konkan Railway News : कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कोकण रेल्वेने कोकणवासीयांना एक मोठी भेट दिली आहे. ती म्हणजे कोकणातून आणखी सुपरफास्ट ट्रेन धावणार आहे. वास्तविक उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या माध्यमातून देशभरातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या मार्गावर रेल्वे सुरू केल्या जात आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेमध्ये वाढणारी गर्दी पाहता रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान चेन्नई जवळील ताम्बरम रेल्वे जंक्शन ते राजस्थानमधील जोधपपूरपर्यंत देखील विशेष सुपरफास्ट ट्रेन चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. 27 एप्रिल 2023 आणि 4 मे 2023 रोजी ही सुपरफास्ट ट्रेन ताम्बरम रेल्वे जंक्शन ते जोधपूर अशी धावणार आहे आणि 30 एप्रिल 2023 आणि 7 मे 2023 रोजी जोधपूर ते ताम्बरम रेल्वे जंक्शन अशी चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वेच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.
ही ट्रेन कोकण मार्गे धावणार असल्याने कोकणवासीयांना या ट्रेनचा फायदा होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या रेल्वेचे वेळापत्रक आणि कोणत्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबणार? याबाबत सविस्तर अशी माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं असेल वेळापत्रक?
ताम्बरम रेल्वे जंक्शन ते जोधपूर
27 एप्रिल आणि चार मे ला ही गाडी दुपारी दोन वाजता ताम्बरम रेल्वे जंक्शन येथून जोधपुरकडे रवाना होणार आहे आणि तिसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी ही ट्रेन जोधपुरला पोहोचणार आहे.
जोधपूर ते ताम्बरम रेल्वे जंक्शन
30 एप्रिल आणि 7 मे ला ही गाडी जोधपूर येथून सायंकाळी साडेपाच वाजता ताम्बरमकडे रवाना होणार आहे. आणि तिसऱ्या दिवशी ही गाडी ताम्बरमला सायंकाळी सव्वासात वाजता पोहोचणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
कुठं राहणार थांबा?
कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गाडीला चेन्नई, एग्मोर, पेरांबूर, अरक्कोनम, कटपाडी, जोलारपेटाई जंक्शन, सेलम जंक्शन, इरोड जंक्शन, तिरुपूर, कोईम्बतूर, पलक्कड, शोरानूर जंक्शन, कोझिकोड, कन्नूर, कासारगोड, मंगळुरु जंक्शन, उडूपी , मडगाव जं., रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, वसई रोड, वापी, वलसाड, सुरत, वडोदरा जं., आनंद जं., अहमदाबाद जं., मेहसाणा, पाटण, भिलडी, राणीवाडा, मारवाड भीनमाळ, मोदरण, जालोर, मोकलसर, समदरी आणि लुनी स्टेशन येथे थांबा राहणार आहे. म्हणजेच कोकणातील रत्नागिरी चिपळूण रोहा पनवेल या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबणार आहे. निश्चितच याचा फायदा कोकणवासियांना होईल यात तीळमात्र देखील शंका नाही.