Kharif Onion Market News : कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. याची लागवड राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात केली जाते. कांद्याची लागवड मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसेच कोकणातही केली जाते. याची लागवड मध्य महाराष्ट्रात सर्वात जास्त केली जाते. राज्याच्या एकूण कांदा उत्पादनात आपल्या नाशिक जिल्ह्याचा मोठा सिंहाचा वाटा आहे.
नाशिकसहित अहमदनगर, पुणे, सोलापूर अशा विविध जिल्ह्यांमध्ये कांदा लागवड होते. या पिकाची लागवड खरीप, लेट खरीप आणि रब्बी अशा तीन हंगामामध्ये केली जाते.
दरम्यान आता आपण खरीप हंगामात उत्पादित केल्या जाणाऱ्या कांद्याच्या टॉप तीन व्हरायट्यांची माहिती पाहणार आहोत. आज आपण महाराष्ट्रात लागवडीसाठी उपयुक्त कांद्याच्या जातींची माहिती जाणून घेणार आहोत.
भीमा रेड : कांद्याची ही एक सुधारित जात आहे. महाराष्ट्रातील हवामान या जातीसाठी विशेष अनुकूल आहे. या वाणाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे खरीप, लेट खरीप आणि रब्बी अशा तीनही हंगामांमध्ये याची लागवड करता येणे शक्य आहे.
रोपवाटिकेत रोपे तयार करून पुन्हा मुख्य शेतात लागवड केल्यानंतर सरासरी 115 ते 120 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होते. यापासून हेक्टरी 21 ते 22 टन एवढे दर्जेदार उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. खरीप हंगामात लागवडीसाठी हा वाण खूपच फायद्याचा ठरतो.
भीमा सुपर : कांद्याचा हा देखील एक सुधारित वाण असून खरीप आणि रांगडा अशा दोन्ही हंगामात याची लागवड करता येणे शक्य आहे. खरीप हंगामामध्ये मुख्य शेतात लागवड केल्यानंतर सरासरी 100 ते 105 दिवसात या जातीचे पीक काढणीस तयार होते. खरीप हंगामात लागवड केल्यास शेतकऱ्यांना हेक्टरी 21 ते 22 टन पर्यंतचे उत्पादन मिळू शकते.
भीमा शक्ती : खरीप हंगामात कांदा लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा वाण फायदेशीर ठरणार आहे. फक्त खरिपातच नाही तर रांगडा हंगामातही याची लागवड करता येणे शक्य आहे.
मुख्य शेतात लागवड केल्यानंतर 120 ते 130 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होते. या जातीपासून सर्वाधिक म्हणजेच हेक्टरी 35 ते 40 टन एवढे उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे.