Karjmafi News : आज उपराजधानी नागपूर येथे सुरू असणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवसं. आज राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावरही उत्तर दिले. अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने लाडकी बहीण योजनेचे पैसे 2100 रुपयांपर्यंत वाढवू तसेच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते. आता राज्यात महायुतीचे सरकार स्थापित झाले आहे.
अशा परिस्थितीत महायुतीने जी आश्वासने दिली होती ती आश्वासने कधीपर्यंत पूर्ण होणार? याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी कधी होणार? हा सवाल आता शेतकऱ्यांकडून उपस्थित होतोय.
आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी देखील हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी विधानसभेत बोलताना शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्याला हात घातला. आपण (देवेंद्र फडणवीस) जाहीरनाम्यामध्ये आणि भाषणांमध्ये शेतकरी कर्जमाफी घोषणा केली होती.
मला अपेक्षित आहे की, याच सभागृहात आपण सरसकट कर्जमाफी करून मार्चपर्यंत पूर्ण करण्याची घोषणा करावी, अशी अपेक्षा मी बाळगतो, असे नाना पटोले विधानसभेत बोलताना म्हणाले. दरम्यान यालाच उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला मोठी माहिती दिली.
कर्जमाफीच्या संदर्भात आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे सांगितलं आहे, ते पूर्ण करू. निश्चितपणे पूर्ण करू. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे जे सांगितले आहे, ते ते आम्ही पूर्ण करू. कर्जमाफीही त्यात आहे, असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
नक्कीच महायुतीने जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचे जे आश्वासन दिलेले आहे ते जर पूर्ण झाले तर राज्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकरी कर्जमाफीमुळे राज्यातील कर्जबाजारी शेतकरी कर्जमुक्त होतील आणि त्यांचे जीवनमान सुधारणार आहे.