Kapus Market : पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापूस पिक राज्यातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका बजावते. या पिकाची राज्यातील विदर्भ, खानदेश आणि मराठवाडा या तीन विभागात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही हे पीक थोड्याफार प्रमाणात उत्पादित होते. देशातील एकूण कापूस लागवडीचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यात देशात सर्वाधिक कापसाची लागवड केली जाते.
लागवडीच्या बाबतीत आपले राज्य प्रथम क्रमांकावर आहे. परंतु उत्पादनात गुजरात राज्याचा नंबर लागतो. अर्थातच आपल्या राज्यात कापसाची एकरी उत्पादकता खूपच कमी आहे.
यावर्षी तर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता आहे. यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात राज्यात फक्त 88% एवढा पाऊस पडला आहे.
म्हणजेच मान्सून काळात यावर्षी सरासरीच्या तुलनेत 12% कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील जवळपास 40 तालुक्यांमध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. यामध्ये काही तालुके कापूस उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात.
कमी पावसामुळे यंदा कापसाचे उत्पादन जवळपास 30 ते 35 टक्क्यांनी कमी होणार असा अंदाज आहे. यामुळे कापसाला यंदा चांगला दर मिळाला पाहिजे असे शेतकऱ्यांना वाटतं आहे.
दरम्यान, यावर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत कापसाला काय दर मिळू शकतो याबाबत पुणे येथील कृषी विभागांतर्गत कार्यरत असलेल्या स्मार्ट प्रकल्पाच्या बाजारमाहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन कक्षाने एक महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे.
या संस्थेने जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीत कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा भाव मिळू शकतो असे सांगितले आहे.
दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2022 मध्ये या कालावधीत कापसाला जवळपास 9500 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला होता. 2023 मध्ये याच कालावधीत 8000 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला होता.
आता 2024 मध्ये या कालावधीत सात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.