Kapus Market Update : अमेरिकेच्या कृषी विभागाने नुकताच डिसेंबर महिन्याचा एक अहवाल सादर केला आहे, ज्याचा परिणाम म्हणून कापसाच्या बाजारभावात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. आता तुम्ही म्हणाल अमेरिकेचा कृषी विभागाचा अहवाल आला म्हणून दरात पडझड होण्याचे कारण काय.
चला तर मग जाणून घेऊया अमेरिकेचा हा अंदाज नेमका आहे तरी काय आणि याचा परिणाम देशांतर्गत कापूस बाजारावर काय होणार. खरं पाहता, युएसएचं कृषी खात कापूस उत्पादनाचा अंदाज कमी करेल असं वाटतं होत.
झालं पण तसचं मात्र कापसाच्या उत्पादनाबरोबरच वापर देखील कमी होणार असा अहवाल अमेरिकेच्या कृषी विभागाने जारी केला आहे. यामुळे जागतिक बाजारात कापसाच्या दरात अचानक पडझड सुरू झाली आहे. देशातील वायदे देखील तुटले. देशांतर्गत बाजारपेठेत देखील याचा परिणाम पाहायला मिळत आहे.
अनेक बाजार समितीमध्ये दर नरमले आहेत. पण शेतकरी बांधवांना जाणकार लोकांकडून धीर धरण्याचा सल्ला दिला जात आहे. पुढील महिन्यात दर वाढीची शक्यता असल्याचे कृषी तज्ञ नमूद करत आहेत. अमेरिकेच्या कृषी विभागाने गेल्या महिन्यात कापसाचे उत्पादन 909 लाख गाठी होईल असं भाकीत वर्तवलं तर या महिन्यात हा अंदाज कमी केला असून 904 लाख कापूस गाठी एवढं होणार असल्याचे नमूद केले आहे.
पण उत्पादनासोबतच वापर देखील कमी होईल असेही अहवालात नमूद करण्यात आल आहे. कापूस वापर ८९८ लाख गाठींवरून ८७२ लाख गाठींपर्यंत कमी होईल असा त्यांचा अंदाज आहे. पण शेतकऱ्यांनी घाबरून जाता कामा नये कारण की गेल्या चार महिन्यापासून अमेरिकेचा कृषी विभाग सातत्याने उत्पादनाचा अंदाज कमी करत आहे.
त्यामुळे प्रत्येक्ष उत्पादनात निश्चितच भली मोठी घट झाली आहे हे समजते. तसेच चीनमध्ये देखील कापसाची मागणी आता वाढण्याची शक्यता आहे. तेथील कोरोना निर्बंध शिथिल होत असल्याने आगामी काही दिवसात मार्केट पूर्णपणे सुरू होणार आहेत, यामुळे प्रमुख ग्राहक चीनमध्ये कापूस मागणी वाढणार असून जागतिक बाजाराला याचा आधार मिळणार आहे.
दरात वाढ होणार आहे. मात्र हा अंदाज सार्वजनिक झाल्यानंतर देशांतर्गत कापूस दरात घट झाली. आज देशांतर्गत 8400 प्रतिक्विंटल पासून ते 8900 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळाला. सध्या मिळत असलेला बाजारभाव शेतकऱ्यांना परवडत नसल्याने त्यांनी कापूस विक्री ऐवजी साठवणुकीवर भर दिला आहे.
हेच कारण आहे की यंदाच्या डिसेंबर महिन्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत 40 टक्के आवक कमी आहे. यामुळे आवकेचा दरावर कोणताच प्रभाव पाहायला मिळत नाहीय. परिणामी उद्योग लॉबीकडून कापसाचे बाजारभाव पाडण्यासाठी प्रयत्न देखील सुरू झाले आहेत.
दर कमी करून आवक वाढवण्यासाठी उद्योगाकडून लॉबी सक्रिय झाली आहे. दरम्यान जाणकार लोकांनी शेतकरी बांधवांना टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करण्याचे आवाहन केले आहे. सध्या केवळ गरजेपुरता आणि संसाराला आवश्यक पैसा जमवण्यापुरताच कापूस विक्री करावा असं सांगितलं जातं आहे.
या महिन्यात कापूस दरात सातत्याने चढ-उतार सुरू राहणार आहे मात्र पुढील महिन्यात दरात वाढ होण्याचीं शक्यता नाकारता येत नाही. निश्चितच अमेरिकेच्या कृषी विभागामुळे काही काळ भावात चढ उतार राहील पण येत्या महिन्यात दरात वाढ होईल असं मत जाणकारांनी व्यक्त केला असल्याने निश्चितच उत्पादक शेतकरी बांधवांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.