Kapus Bajarbhav : भारतात जवळपास सर्वत्र कापसाची लागवड (Cotton Cultivation) केली जाते. आपल्या महाराष्ट्रातील कापूस (Cotton Crop) लागवड विशेष उल्लेखनीय आहे. गेल्या वर्षी कापसाला चांगला ऐतिहासिक उच्चांकी बाजार भाव (Cotton Rate) मिळाला असल्याने या वर्षी कापूस लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. दरम्यान सप्टेंबर पर्यंत हवामान बदलामुळे (Climate Change) आणि पावसाच्या लहरीपणामुळे कापूस पिकाला मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांच्या (Farmer) मते या वर्षी कापूस उत्पादनात मोठी घट होणार आहे.
मात्र कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांनी एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे. या असोसिएशनच्या मते या वर्षी सप्टेंबरपर्यंत केलेल्या निरीक्षणाच्या आधारे महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये कापसाचे उत्पादन वाढले आहे. या संस्थेच्या मते यंदा गेल्या वर्षीपेक्षा कापसाचे उत्पादन अधिक होईल. प्रामुख्याने गुजरात आणि महाराष्ट्रात कापसाचे उत्पादन अधिक झाले असल्याने देशांतर्गत एकूण कापूस उत्पादन वाढणार असल्याचा अहवाल कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांनी दिला आहे.
यावर्षीचा कापूस हंगाम हा एक ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. मात्र, मुहूर्ताच्या कापसाला अकरा हजार रुपये प्रतिक्विंटल ते पंधरा हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा बाजार भाव महाराष्ट्रात नमूद करण्यात आला होता. मात्र त्यानंतर कापसाच्या बाजार भावात मोठी घसरण झाली आहे. शेतकरी बांधवांनी आरोप केला आहे की व्यापाऱ्यांनी कापसामध्ये आद्रता अधिक असल्याचे कारण पुढे करत बाजार भाव हाणून पाडले आहेत.
शिवाय यावर्षी 344 लाख गाठी कापूस उत्पादन होईल असा अहवाल कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांनी जाहीर केला असल्याने कापसाचे भाव दबावात येण्याची शक्यता आहे. दरम्यान काही जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांनी जाहीर केलेला हा अंदाज सप्टेंबर महिन्यापर्यंतच्या निरीक्षणावर आधारित आहे. मात्र कापसाचे खरे नुकसान ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे कॉटन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खानदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.
यामुळे खानदेशात कापसाचे उत्पादन कमी होणार आहे. शिवाय विदर्भ, मराठवाडा या ठिकाणीदेखील परतीच्या पावसाने हजेरी लावली आणि परतीच्या पावसामुळे वावरात कापसाच्या वाती तयार झाल्या आहेत, कुठे सडबोंड झाली आहे. अनेक ठिकाणी मूळकूज यांसारखे रोग देखील कापसावर पाहायला मिळाले आहे. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात घट होणारच आहे. यामुळे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांचा हा अहवाल चुकणार आहे असा दावा शेतकरी समवेतच काही जाणकारांनी देखील केला आहे.
सध्या भारतात कापसाला सात हजार रुपये प्रतिक्विंटल ते नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळत आहे. भविष्यात देखील कापसाला 9 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा सर्वसाधारण बाजार भाव गृहीत धरून शेतकरी बांधवांनी कापसाची विक्री करावी असे आवाहन यावेळी जाणकारांनी केला आहे.