Kapus Bajarbhav : यावर्षी महाराष्ट्राला दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. मान्सून काळात म्हणजे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात यावर्षी फक्त 88% एवढा पाऊस झाला आहे. म्हणजेच महाराष्ट्रात जवळपास 12% एवढा कमी पाऊस बरसला आहे. राज्यातील जवळपास 15 जिल्ह्यांतील 40 तालुक्याला दुष्काळाची झळ अधिक बसली आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाने या संबंधित 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ देखील जाहीर केला आहे. दुष्काळामुळे सोयाबीन आणि कापूस या प्रमुख पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. कापसाच्या उत्पादनाचा विचार केला असता यावर्षी कापूस उत्पादनात जवळपास 30 ते 35 टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते असे जाणकार लोकांकडून सांगितले गेले आहे.
यामुळे यंदा कापसाला चांगला भाव मिळायला हवा असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तूर्तास मात्र पांढरे सोने काळवंडले आहे. कापुस बाजार भाव पूर्णपणे दबावात आले आहेत. खरंतर नवीन कापूस बाजारात दसऱ्याच्या मुहूर्ताला येऊन जातो. दसऱ्याच्या मुहूर्ताला राज्यातील जवळपास सर्वच प्रमुख कापूस उत्पादन जिल्ह्यांमध्ये कापसाची मोठी आवक पाहायाला मिळते.
यावर्षी मात्र मान्सून काळात पावसाचे उशिराने आगमन झाले असल्याने आणि जून तसेच ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड राहिला असल्याने अजूनही अनेक भागातील कापूस वेचणीसाठी तयार झालेला नाही. जो कापूस सध्या बाजारात येत आहे तो बागायती भागातील कापूस आहे.
म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची थोडीफार उपलब्धता होती आणि जिथे चांगला पाऊस झाला आहे अशा बागायती भागांमध्ये कापूस सध्या बाजारात येत आहे. कोरडवाहू भागातील कापूस मात्र अजूनही वेचणीसाठी तयार झालेला नाही.
याचा परिणाम म्हणून सध्या बाजारात खूपच कमी प्रमाणात नवीन कापसाची आवक पाहायला मिळत आहे. पण आवक कमी असतानाही बाजार भाव अजूनही दबावात असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढत आहे. दरम्यान भविष्यात कापसाला काय भाव मिळणार हा देखील प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावू लागला आहे.
सध्या बाजारात येत असलेल्या कापसाच्या नवीन मालाला सरासरी साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल ते साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळत आहे. बाजारात सध्या कापसाची आवक कमी आहे मात्र दिवाळीच्या काळात आवक वाढेल असा अंदाज आहे.
याचे मुख्य कारण म्हणजे सणासुदीला शेतकऱ्यांना पैशांची निकड भासणार आहे. यामुळे कापूस वेचणी झाल्यानंतर लगेचच मालाची विक्री केली जाणार आहे. अशातच आता भविष्यात कापसाला काय भाव मिळणार याबाबत तज्ञ लोकांनी मोठी माहिती दिली आहे.
जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीत कापसाला काय दर मिळू शकतो याबाबत पुण्यातील कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्प अंतर्गत स्थापित करण्यात आलेल्या बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापक कक्षाने एक महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे.
या संस्थेने जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीत कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. यामुळे आता या संस्थेचा हा अंदाज खरा ठरतो का याकडे शेतकऱ्यांचे बारीक लक्ष लागून राहणार आहे.