Kapus Bajarbhav : गेल्या वर्षी कापसाला चांगला विक्रमी बाजार भाव (Cotton Rate) मिळाला असल्याने यावर्षी कापूस लागवडी खालील क्षेत्रात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी देखील कापसाला चांगला बाजारभाव मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र या हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापूस दर दबावात आहेत. खरं पाहता या वर्षी महूर्ताला 11000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव नमूद करण्यात आला.
तदनंतर मात्र बाजारभावात मोठी घसरण झाली. कापसाला आता सात हजार रुपये प्रति क्विंटल आसपास बाजार भाव मिळत आहे. दिवाळीनंतर कापसाच्या बाजार भावात वाढ होणार असल्याचा अंदाज होता. मात्र आता दिवाळी उलटून तीन ते चार दिवस होत आलेत मात्र अजूनही अपेक्षित असा कापसाला उठाव पाहायला मिळत नाहीये.
कापसाचे बाजार भाव अजूनही दबावात असून सध्या कापूस सात हजार रुपये प्रति क्विंटल ते नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल दरम्यान विक्री होत आहे. जाणकार लोकांच्या मते, सध्या देशांतर्गत वायद्यात कापसाचे बाजार भाव कमी झाले आहेत. यामुळे कापसाला सध्या कमी बाजारभाव मिळत आहे. दरम्यान व्यापारी लोकांच्या मते, परतीच्या पावसामुळे कापसाची गुणवत्ता कमी झाली आहे.
अशा परिस्थितीत परतीच्या पावसात सापडलेला कापूस सध्या बाजारपेठेत कमी भावात विक्री होत आहे. परतीच्या पावसात सापडलेला कापूस सध्या सात हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास विक्री होत आहे. मात्र चांगला दर्जाचा कापूस 8 हजार रुपये प्रति क्विंटल ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.
दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर नंतर कापूस बाजारभावात तेजी येण्याची शक्यता आहे. डिसेंबर नंतर जागतिक बाजारात कापसाला चांगला उठाव मिळणार असून याचा परिणाम देशांतर्गत बाजारात होणार असून कापसाचे बाजार भाव वाढण्याची दाट शक्यता असल्याचे जाणकारांनी नमूद केले आहे. निश्चितच डिसेंबर नंतर कापसाच्या बाजारभावात वाढ झाल्यास कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.