Kapus Bajarbhav : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कापसाच्या बाजार भावात गेल्या सात ते आठ दिवसापासून रोजाना वाढ होत आहे. कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणार एक मुख्य नगदी पीक आहे.
कापसाची महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात शेती केली जाते. परभणी जिल्ह्यातही कापूस लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय असून जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण कापूस या नगदी पिकावर अवलंबून असते.
आता परभणी जिल्ह्यातील एक महत्त्वाची कापूस बाजार पेठ अर्थातच मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती मधून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मानवत एपीएमसी मधील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड मध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ झाला आहे.
14 तारखेला एपीएमसी मध्ये कापूस खरेदी सुरू झाली असून खरेदीच्या पहिल्याच दिवशी कापसाला विक्रमी बाजारभाव मिळाला आहे. 14 तारखेला झालेले लावाती या एपीएमसी मध्ये कापसाला तब्बल 9521 रुपये प्रति क्विंटलचा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच किमान बाजार भाव 9400 नमूद करण्यात आला आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची कापूस बाजारपेठ म्हणून उदयास आली आहे.
विशेष म्हणजे कापूस विक्रीसाठी शेतकरी बांधव या बाजार समितीला अधिक प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. या बाजार समितीमध्ये इतर बाजार समितीच्या तुलनेत कापसाला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा ओढा मानवत एपीएमसी कडे वळत आहे. दरम्यान आता या एपीएमसी मध्ये कापूस खरेदी सुरू झाली असून कापसाला चांगला विक्रमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात ते आठ दिवसांपासून कापसाच्या दरात चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढत असल्याने तसेच बाजारात तेलबिया पेंड महागले असल्याने सरकी पेंड ची मागणी वाढली असून परिणामी कापसाची मागणी वाढत आहे या सर्व समीकरणाच्या पार्श्वभूमीवर कापसाच्या दरात रोजाना वाढ नमूद केली जात आहे.
निश्चितच या एपीएमसी मध्ये झालेल्या पहिल्या दिवशीच्या लिलावात कापसाने जवळपास दहा हजाराचा टप्पा गाठला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून शेतकऱ्यांना अजून भाव वाढ अपेक्षित आहे.
एका मीडिया रिपोर्ट मध्ये दावा करण्यात आला आहे की महाराष्ट्रात खेडा खरेदीमध्ये कापसाला चांगला उच्चांकी दर मिळत आहे. खेडा खरेदीमध्ये कापसाला तब्बल 9900 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल दर मिळू लागला आहे. त्यामुळे निश्चितच येत्या काही दिवसात कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना सोन्याचे दिवस येणार आहेत.