Kapus Bajarbhav : मित्रांनो खरं पाहता गेल्या वर्षी कापसाला ऐतिहासिक बाजार भाव (Cotton Rate) मिळाला होता. गेल्या वर्षी कापूस लागवडी खालील क्षेत्र कमी असल्याने तसेच कापसाचे उत्पादन घटल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला कधी नव्हे ते विक्रमी मागणी आल्याने कापसाच्या बाजारभावात मोठी वाढ झाली होती. गेल्या वर्षी संपूर्ण हंगामभर कापूस दहा हजार रुपये प्रति क्विंटल च्या वरती विक्री होत होता.
मात्र यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाला अतिशय नगण्य बाजार भाव मिळत आहे. खरं पाहता विजयादशमी अर्थातच दसऱ्यापासून कापसाचा हंगाम सुरू झाला आहे. मुहूर्ताच्या कापसाला यावर्षी उच्चांकी बाजार भाव देखील मिळाला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद मध्ये यावर्षी कापसाला 11000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळाला असून खानदेश मधील जळगाव जिल्ह्यात कापसाला कधी नव्हे तो चक्क सोळा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजारभाव नमूद करण्यात आला आहे.
दरम्यान, मुहूर्ताच्या कापसाला चांगला बाजार भाव मिळाल्यानंतर कापूस बाजार भावात चांगलीच घसरण पाहायला मिळाली आहे. जाणकार लोकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला अपेक्षित असा उठाव नसल्याने कापसाला कमी बाजार भाव मिळत आहे. तसेच जागतिक बाजारात कमालीची मंदी असल्याने कापड उद्योग प्रभावित झाला आहे, यामुळे भारतीय कापडाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी होत नसल्याचे चित्र आहे.
यामुळे कापसाला अपेक्षित असा बाजार भाव मिळत नसल्याचे जाणकार नमूद करत आहेत. खरं पाहता देशांतर्गत कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत आहे. मात्र सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला केवळ सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा उच्चांकी बाजार भाव मिळाला आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांची आर्थिक कोंडी होत आहे.
कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या मते कापूस पिकासाठी 8 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा उत्पादन खर्च येत आहे. मात्र सध्या मिळत असलेला बाजार भाव हा उत्पादन खर्चापेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत कापसाच्या पिकातून मिळणाऱ्या उत्पन्नात कापूस पिकासाठी झालेला खर्च काढणे देखील अवघड बनले आहे. दरम्यान जाणकार लोकांनी शेतकरी बांधवांना 9000 रुपये प्रति क्विंटल एवढी दर पातळी लक्षात ठेवून कापसाची विक्री करण्याचा सल्ला दिला आहे.