Kapus Bajarbhav : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना चीनचा सहारा लाभला आहे. चीनमध्ये कोरोना नामक महाभयंकर आजाराचे थैमान काहीसे कमी झाले असल्याने, तेथील बाजार पूर्वपदावर येत असून कापड उद्योगासाठी कापसाची मागणी वाढली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या बाजारभावात सुधारणा झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला चांगला दर मिळू लागल्याने देशांतर्गत बाजारात कापूस पुन्हा एकदा भरारी घेऊ लागला आहे. दरम्यान गेल्या तीन ते चार दिवसांपासून कापूसाच्या बाजारभावात 300 ते 400 रुपयांची वाढ झाली आहे.
त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरं पाहता सप्टेंबर मध्ये कापसाला थोडासा समाधानकारक बाजार भाव मिळत होता मात्र ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी शेवटी कापसाला हंगामातील सर्वात कमी बाजार भाव मिळू लागला. मात्र आता कापसाच्या बाजारभावात वाढ होत आहे. गुरुवार पासून कापूस बाजारभावात मोठी वाढ होत आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार शुक्रवारी कापसाच्या बाजारभावात तब्बल पाच टक्क्यांची वाढ नमूद करण्यात आली. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधव तूर्तास सुखावला असल्याचे चित्र आहे.
यामुळे वाढलेत कापसाचे बाजार भाव
मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या मागणीमुळे कापूस बाजाराला आधार मिळाला आहे. चीनमध्ये आता लॉकडाऊन शिथिल झाले असल्याने उद्योगधंद्यांना उभारी मिळत असून आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढली आहे. यामुळे देशांतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या बाजारभावात वाढ होत आहे. याव्यतिरिक्त, कापसाचे बाजार भाव ऑक्टोबर मध्ये कमालीचे कमी झाले होते, यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी कापसाची विक्री करणे ऐवजी साठवणूक करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले. परिणामी बाजारात कापसाची आवक कमी झाली.
यामुळे कापसाच्या बाजारभावात वाढ होण्यास मदत मिळाली. याव्यतिरिक्त भारतात आयात होणाऱ्या कापसावर पुन्हा एकदा अकरा टक्के शुल्क आकारले जात आहे. यामुळे देखील कापूस बाजारभावात सुधारणा होण्यास मदत लागली आहे. मित्रांनो आता देशांतर्गत कापसाला आठ हजार रुपये प्रति क्विंटलहुन अधिक बाजार भाव मिळू लागला आहे. देशातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कापसाला कमाल बाजार भाव नमूद करण्यात आला आहे. राज्यातील बाजारात देखील कापसाला चांगला दर मिळू लागला आहे.
कापसाच्या विक्री बाबत जाणकार लोकांचे मत
मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांना सध्या पैशांची चणचण असेल त्यांनी या बाजारभावात कापसाची विक्री करण्यास काही हरकत नाही. दरम्यान यां हंगामात कापसाला 9 हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजार भाव मिळू शकतो. मात्र यासाठी शेतकरी बांधवांना अजून काही काळ कापसाची साठवणूक करावी लागणार आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी कापसाची विक्री करताना बाजारपेठेचा आढावा घेत टप्प्याटप्प्याने विक्री केली तर त्यांच्यासाठी फायद्याचे राहणार आहे.