Kapus Bajarbhav : यावर्षी कापसाचा हंगाम विजयादशमीपासून सुरू झाला आहे. दरम्यान टप्प्याटप्प्याने राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस खरेदीला सुरुवात होत आहे. अनेक ठिकाणी कापूस खरेदीमध्ये कापसाला आता विक्रमी दर मिळू लागला आहे. यामुळे राज्यातील कापूस उत्पादकांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे.
देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील 15 नोव्हेंबर रोजी कापूस खरेदीचा श्री गणेशा झाला आहे. 15 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या कापूस खरेदी देऊळगाव एपीएमसी मध्ये कापसाला चांगला दर मिळाला आहे. 15 नोव्हेंबर रोजी झालेल्या लिलावात कापसाला या ठिकाणी 9395 प्रतिक्विंटल चा कमाल बाजारभाव मिळाला आहे. खरं पाहता गेल्यावर्षी कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजारभाव मिळाला होता.
गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली असल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मोठी मागणी असल्याने कापसाला बारा हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक दर मिळत होता. गेल्या हंगामाच्या शेवटी देखील कापसाला 12000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळत होता. विशेष म्हणजे या हंगामाच्या सुरुवातीला मराठवाड्यात आणि खानदेशात कापसाला चांगला विक्रमी दर मिळाला.
खानदेशात एका मीडिया रिपोर्टनुसार 16000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला तर औरंगाबाद मध्ये 11000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळाला. मात्र सदर बाजार भाव मुहूर्ताच्या कापसाला देण्यात आला आणि त्यानंतर कापूस दरात घसरण झाली. मात्र गेल्या एका आठवड्यापासून कापूस दरात सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. सध्या राज्यात 9000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक सरासरी बाजारभावाने कापसाची विक्री होत आहे. देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील कापसाच्या खरेदीचा श्री गणेशा झाला असून खरेदीच्या पहिल्याच दिवशी 9395 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
निश्चितच यामुळे परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. दरम्यान बाजार समिती प्रशासनाने शेतकरी बांधवांना खेडा खरेदीत कापसाची विक्री न करता बाजार समितीमध्ये येऊन कापसाची विक्री करावी असे आवाहन केले आहे. बाजार समिती प्रशासनाच्या मते खेडा खरेदीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. खेडा खरेदीत अनेकदा व्यापाऱ्यांकडून वजनात काटेमारी केली जाते.
शिवाय अनेकदा शेतकरी बांधवांना पैसे दिले जात नाहीत. खेडा खरेदीमध्ये होणाऱ्या कापूस विक्रीवर बाजार समितीचे कोणतेच बंधन नसते. यामुळे शेतकऱ्यांचे फसवणूक होऊ शकते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी बाजार समितीत कापूस विक्री केल्यास त्यांची फसवणूक होणार नाही. यामुळे शेतकरी बांधवांनी बाजार समितीत कापूस विक्रीस प्राधान्य द्यावे असे जाणकार देखील नमूद करत आहेत.