Kapus Bajarbhav : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. कापसाची मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात सर्वाधिक लागवड पाहायला मिळते. या हंगामातील कापसाची सध्या वेचणी शेतकरी बांधव करत आहेत.
खानदेशात वेचणी अंतिम टप्प्यात आली असून अनेक ठिकाणी शेतकरी बांधव फरदड कापसाचे उत्पादन घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत. विदर्भात देखील काहीशी अशीच परिस्थिती आहे. अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधव सध्या कापसाची वेचणी करण्यासाठी धावपळ करत असल्याचे चित्र आहे. सध्या महाराष्ट्रात कापसाला विक्रमी दर मिळू लागला आहे.
काल झालेल्या लिलावात कापसाला आर्वी एपीएमसी मध्ये तब्बल 9500 प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. विशेष म्हणजे या एपीएमसी मध्ये सरासरी बाजार भाव 9 हजार 400 हजार चारशे रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे. मात्र असे असले तरी खानदेशात आणि पुणे जिल्ह्यात कापसाचे दर कमी आहेत.
खांदेशात कापसाला सरासरी बाजारभाव आठ हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी मिळतोय तर पुणे जिल्ह्यातही सरासरी बाजार भाव 9,000 रुपये प्रतिक्विंटल पेक्षा कमीच आहे. मात्र, राज्यातील एकंदरीत परिस्थिती पाहता कापसाचे दर समाधानकारक आहेत. अमरावती जिल्ह्यातही कापसाला नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. म्हणजेच विदर्भात देखील कापूस विक्रमी दरात विक्री होऊ लागला आहे.
मात्र कापसाला जरी विक्रमी दर मिळत असला तरी देखील बळीराजा पुरता संकटात सापडला आहे. खरं पाहता खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी बांधवांच्या मते अतिवृष्टीमुळे त्यांचे 70 ते 80 टक्के उत्पादन कमी होणार आहे. यामुळे कापसाच्या दरात वाढ झाली असली तरी देखील या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नसून केवळ उत्पादनात झालेली घट भरून निघण्यास दरवाढीचा सहारा मिळणार आहे.
निश्चितच कापसाच्या बाजारभावात वाढ होऊन देखील शेतकऱ्यांना फायदा मिळत नसल्याचा हा संयोग शेतकऱ्यांच्या काळजावर घाव घालत आहे. खरं पाहता महाराष्ट्रातील बहुतेक भागात कापूस आणि सोयाबीन या दोन पिकावर शेतकऱ्यांचा मदार असतो. राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे अर्थकारण या दोन नगदी पिकांवर अवलंबून असते.
मात्र यावर्षी सुरुवातीला मान्सूनचे उशिरा आगमन झाल्याने तसेच जुलै आणि ऑगस्टच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे तसेच ऐन कापूस वेचणी अंतिम टप्प्यात असताना तसेच सोयाबीन हार्वेस्टिंग सुरू असताना झालेला परतीचा पाऊस यामुळे शेतकरी बांधवांच्या या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या उत्पादनात भली मोठी घट घडली आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात पुरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली होती.
यामुळे शतशिवारात पाणी लबालप भरले होते. परिणामी कापूस समवेत सर्व मुख्य पिके पाण्याखाली गेली. कापूस पिकावर वेगवेगळ्या रोगांचे आक्रमण पाहायला मिळाले. वावरातच पाणी साचले असल्याने कापसाची वाढ खुंटली. पाने पिवळे पडू लागली कापूस पिकात फळ धारणा झाली नाही. परिणामी कापसाच्या उत्पादनात घट झाली असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकरी बांधवांच्या मते दरवर्षी एकरी आठ ते दहा क्विंटल पर्यंतच कापसाचा उतारा मिळत असतो.
मात्र यावर्षी एकरी केवळ दोन क्विंटल पर्यंतचा उतारा मिळत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शिवाय सध्या कापसाला समाधानकारक दर मिळत असला तरी देखील गेल्या वर्षी पेक्षा कमीच बाजारभाव आहे. यामुळे कापसाला समाधानकारक बाजार भाव मिळाला असला तरी देखील झालेले नुकसान भरून निघेल की नाही याबाबत शेतकरी अजूनही संभ्रमात आहेत.
अशा परिस्थितीत कापूस दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना बिलकुल होत नसल्याचे चित्र विशेषतः विदर्भात उभे राहत आहे. खानदेशात देखील काहीशी अशीच परिस्थिती असून मराठवाडा देखील अतिवृष्टीमुळे भरडला गेला होता. सहाजिकच राज्यातील एकंदरीत परिस्थिती पाहता सर्वच विभागात कापसाचे उत्पादन कमी झाले असल्याने कापूस दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा होत नाहीये.