Kapus Bajarbhav : कापसाचा हंगाम एक ऑक्टोबर रोजी सुरू झाला आहे. हंगामाच्या सुरुवातीला यावर्षी कापसाला चांगला विक्रमी दर देखील मिळाला. काही मीडिया रिपोर्ट मध्ये केलेल्या दाव्यानुसार खानदेश मध्ये मुहूर्ताच्या कापसाला तब्बल 16 हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला होता. इकडे औरंगाबाद विभागात देखील मुहूर्ताच्या कापसाला 11000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळाला.
मात्र तदनंतर कापूस दरात मोठी घसरण झाली. मात्र आता गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कापसाच्या दरात पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. बाजार समितीमध्ये मिळणाऱ्या दरापेक्षा खेडा खरेदीमध्ये कापसाला अधिक दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.
अकोला जिल्ह्यात खेडा खरेदी मध्ये 9700 प्रतिक्विंटल पर्यंतचा बाजार भाव कापसाला मिळू लागला आहे. दरम्यान एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की खेडा खरेदीमध्ये महाराष्ट्रात कापसाला तब्बल 9900 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर आता मिळत आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या गाठीचा दर वाढत असल्याने देशांतर्गत कापूस दरात वाढ होत आहे. याव्यतिरिक्त काही जाणकार लोकांनी बाजारात तेलबिया पेंड महागले असल्याने सरकी पेंडची मागणी वाढली आहे आणि परिणामी कापसाची मागणी आणि बाजार भाव वाढत असल्याचे नमूद केले आहे. याचा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
दरम्यान कापूस उत्पादक शेतकरी बांधव या बाजारभावात देखील कापूस विक्री करण्यासाठी तयार नसल्याचे चित्र आहे. परिणामी बाजारात कापसाचे आवक कमी झाली आहे. त्यामुळे देखील कापूस दरात वाढ होण्यास मदत होत आहे. खरं पाहता गेल्यावर्षी हंगामाच्या शेवटी देखील कापसाला बारा हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला होता. यामुळे यावर्षी देखील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला विक्रमी दर मिळण्याची आशा आहे.
शिवाय गेल्यावर्षी चांगला दर मिळाला असल्याने यावर्षी कापसाचा पेरा देखील वाढला आहे. मात्र तूर्तास तरी गेल्यावर्षीप्रमाणे बाजार भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. हेच कारण आहे की कापूस बाजार भाव वाढतील या आशेने कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी कापसाची साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान यावर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पावसाच्या लहरीपणामुळे फटका बसला आहे. सुरुवातीला पावसाचे आगमन उशिरा झाले आणि शेवटी परतीचा पाऊस ऐन कापूस वेचणीच्या वेळी दाखल झाला यामुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे. शिवाय गुलाबी बोंड आळी सारख्या रोगांचे देखील कापसावर सावट राहिले. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना उत्पादनात झालेली घट भरून काढण्यासाठी अधिक दर मिळणे अपेक्षित आहे.
यामुळे सध्या कापसाच्या दरात वाढ झालेली असली तरी देखील कापूस विक्रीसाठी शेतकरी बांधव झजावत नसल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षी एकरी आठ ते दहा क्विंटल एवढे उत्पादन कापसाच्या पिकातून शेतकऱ्यांना मिळाले मात्र यावर्षी शेतकऱ्यांना यापेक्षा निम्मेही उत्पादन हाती आलेले नाही. परिणामी कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना दहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या पुढे कापूस बाजार भाव अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे.