Kapus Bajarbhav : गेल्या दोन आठवड्यांपासून कापसाच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. कापूस पंढरी जळगाव जिल्ह्यातही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापसाच्या दरात वाढ होत असल्याने दिलासा मिळत आहे.
खरं पाहता यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला जळगाव जिल्हा विशेष चर्चेत आला होता. यावर्षी जिल्ह्यात गणेश चतुर्थीच्या दिवशी कापूस खरेदीला सुरुवात झाली. या दिवशी जिल्ह्यातील बोदवड मध्ये कापसाला तब्बल 14 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळाला.
हा बाजारभाव माहूर्ताच्या कापसाला देण्यात आला होता आणि कापूस मात्र सात किलो एवढाच होता. मात्र असे असले तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा यामुळे वाढल्या होत्या.
मात्र ज्यावेळी शेतकरी बांधवांची कापूस वेचणी सुरू झाली कापूस शेतकऱ्यांच्या घरात येऊ लागला त्यावेळी व्यापाऱ्यांनी कापसाचे बाजार भाव हाणून पाडलेत. शेतकरी बांधवांच्या मते कापसामध्ये अधिक आद्रता असण्याचे कारण पुढे करत कापूस व्यापाऱ्यांकडून कापसाचे बाजार भाव हाणून पाडले गेलेत.
मुहूर्ताच्या कापसाला 14 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आणि जेव्हा शेतकऱ्यांकडे कापूस मोठ्या प्रमाणात आला तेव्हा कापसाला मात्र 8000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दर मिळत होता. या कवडीमोल दरात शेतकऱ्यांना कापूस विक्री करणे परवडणारे नव्हते मात्र दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बहुतांशी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सन साजरी करण्यासाठी कापसाची विक्री केली.
दरम्यान आता कापूस दरात वाढ झाली आहे. कापसाला साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक बाजार भाव मिळू लागला आहे. काल झालेल्या लिलावात देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला तब्बल 9650 रुपये प्रति क्विंटलचा कमाल बाजार भाव मिळाला आहे. म्हणजेच आता कापसाला विक्रमी दर मिळू लागले आहेत. मात्र असे असले तरी कापूस उत्पादक शेतकरी बांधव कापसाला अधिक दर मिळत असूनही कोंडीत सापडत असल्याचे चित्र आहे.
कापसाचे दर वाढत आहेत मात्र कापूस उत्पादित करण्यासाठी लागणारा खर्च देखील दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकरी बांधवांच्या मध्ये सध्या कापूस मोजणी करण्यासाठी 12 ते 14 रुपये प्रति किलो एवढी मजुरी मोजावी लागत आहे. तसेच पेरणी पासून ते वेचणी करण्यापर्यंत बियाणे, खत, औषध इत्यादी खर्चाची आकडेमोड केली तर आपण कापूस का लावला हा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढ्यात उभा होत आहे.
एकंदरीत कापसाला विक्रमी दर मिळत असला तरी देखील उत्पादन खर्चाचे गणित पाहता कापूस पिकातून शेतकऱ्यांना कवडीमोल उत्पन्न मिळणार आहे. दरम्यान कापसाची दर वाढ होण्याचे प्रमुख कारणे देखील शेतकरीच बनले आहेत. खरं पाहता, शेतकऱ्यांनी दिवाळी सणासाठी आवश्यक पैशांची जमवाजमव करण्यासाठी थोड्याफार प्रमाणात कापसाची विक्री केली. मात्र तदनंतर शेतकरी बांधवांनी कापूस कमी भावात विक्री करायचा नाही असं ठरवलं. या अनुषंगाने त्यांनी कापसाची साठवणूक केली.
शेवटी अपेक्षित प्रमाणात जिनिंगकडे कापूस उपलब्ध होत नव्हता. यामुळे भाव वाढ करण्यात आली. सध्या कापूस साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दरात विक्री होत असून येत्या काही दिवसात कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळेल अशी शेतकऱ्यांची आशा आहे. दरम्यान जिनिंग चालकांनी कापूस दरवाढ होणार नसल्याचे सांगितले आहे.
कापूस सरकीचे भाव कमी झाले असून आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला अपेक्षित असा उठाव नसल्याचे कारण पुढे करत कापसाची दरवाढ होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे येत्या काही दिवसात कापसाला काय बाजार भाव मिळतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.