Kapus Bajarbhav : कापूस हे खरीप हंगामात उत्पादित केले जाणारे एक मुख्य पीक आहे. या पिकाची खानदेश मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र म्हणजे जवळपास सर्वत्र मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पुणे जिल्ह्यातही कापूस लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. 2नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या खरेदीचा श्री गणेशा झाला आहे. खरं पाहता बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 35 वर्षांनंतर कपसाची पुन्हा एकदा खरेदी सुरू झाली आहे. बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती एकेकाळी कापसाचे लिलावासाठी विशेष ओळखली जात होती. मात्र तदनंतर परिसरात कापूस लागवडीखालील क्षेत्र घटले शिवाय बाजारात कापसाची आवक कमी झाली परिणामी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाचे लिलाव होणे बंद झाले.
आता पुन्हा एकदा बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाचे खरेदी सुरू झाली आहे. तब्बल 35 वर्षानंतर या एपीएमसी मध्ये कापूस खरेदी होणार असल्याने शेतकऱ्यांसमवेतच बाजार समिती प्रशासनामध्ये मोठे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्या दिवशी झालेल्या खरेदीत कापसाला समाधानकारक बाजारभाव मिळाला आहे. पहिल्या दिवशी कापसाला कमाल बाजार भाव 8,901 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला आहे. या दिवशी बाजार समितीमध्ये 30 क्विंटल एवढी कापसाची आवक झाली होती.
सरासरी बाजारभाव मात्र साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल एवढाच मिळाला. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाची खरेदी बुधवारी आणि शनिवारी होणार आहे. निश्चितच या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाची खरेदी सुरू झाली असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. दरम्यान सध्या मिळत असलेला बाजार भाव हा कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या अपेक्षा प्रमाणे नाहीये. कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या मते, सध्या मिळत असलेल्या बाजारभावात कापूस पिकासाठी झालेला खर्च काढणे मुश्कील आहे.
अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना कापसाच्या बाजार भावात वाढ होण्याची आशा आहे. दरम्यान जाणकार लोकांनी शेतकरी बांधवांना बाजारपेठेचा आढावा घेत कापसाची विक्री करण्याचा सल्ला दिला आहे. जाणकार लोकांच्या मते कापसाला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी 9000 रुपये प्रति क्विंटल एवढी तर पातळी ध्यानात घेऊन कापसाची टप्प्याटप्प्याने विक्री करत राहणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.