Kapus Bajarbhav : कापूस पंढरी जळगाव मधून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जळगाव जिल्ह्यात कापसाच्या दरात वाढ होत आहे. खरं पाहता , हंगामाच्या सुरुवातीला जळगाव जिल्ह्यात मुहूर्ताच्या कापसाला तब्बल 16 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला होता.
तदनंतर मात्र कापसाच्या दरात मोठी घसरण झाली. कापूस आठ हजार ते साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल वर स्थिरावला. मात्र आता कापूस दरात चांगली वाढ होत आहे. खेडा खरेदीमध्ये कापसाचे दर वधारले आहेत. मात्र खेडा खरेदी देखील पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचे चित्र आहे. खेडा खरेदी जळगाव जिल्ह्यात कापसाला 9100 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे.
जळगाव जिल्ह्यात कापसाचे वेचणी जोरावर सुरू असून बहुतांशी शेतकरी बांधवांचा कापूस मोठ्या प्रमाणात वेचणी झाला आहे. मात्र शेतकरी बांधव कापूस विक्री करण्यास तयार नसल्याचे चित्र असून शेतकरी बांधव आता कापसाची साठवणूक करत आहेत. ज्या शेतकरी बांधवांचा कापूस वेचणी झाला आहे असे शेतकरी बांधव रान मोकळे करत आहेत. शेतकऱ्यांच्या मते अतिवृष्टीमुळे तसेच परतीच्या पावसामुळे कापूस पीक फरदड घेण्याच्या परिस्थितीत नाही.
यामुळे रान मोकळे केले जात आहे. खरं पाहता गेल्या हंगामात जळगाव जिल्ह्यात फरदडचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात आले होते. मात्र या हंगामात दिवाळीपर्यंत कापूस दर दबावात असल्याने तसेच अजूनही कापसाच्या दरात अपेक्षित अशी तेजी नसल्याने आणि कापूस पीक देखील पावसाच्या लहरीपणामुळे कोमात गेले असल्याने फरदड उत्पादन घेण्यास शेतकरी टाळाटाळ करत आहेत.
दरम्यान शेतकरी बांधवांना कापसाला किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळावा अशी आशा आहे. यामुळे कापूस विक्री न करता शेतकरी साठवणूक करत आहेत. शेतकरी बांधवांच्या मते कापूस पेरणी पासून ते वेचणीपर्यंत सर्व स्टेजवर खर्च वाढला आहे. यामुळे दहा हजारापेक्षा कमी दरात कापूस विकायला परवडत नाही. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील काही जिनिंग प्रेसिंग कारखाने शंभर टक्के क्षमतेने काम करत आहेत.
मात्र अजूनही संपूर्ण कारखाने सुरू झालेले नाहीत. शिवाय गुजरात मधून देखील खानदेशातील कापसाला उठाव नाही. यामुळे खेडा खरेदी संथ गतीने सुरु आहे. शिवाय दरवाढीच्या आशेने शेतकरी बांधवांनी कापूस साठवून ठेवला आहे. जाणकार लोकांनी नोव्हेंबर महिन्यात कापसाचे दर वाढतील अशी भविष्यवाणी केली होती आणि आता जाणकारांचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याचे चित्र आहे.