Kapus Bajarbhav : गेल्या काही वर्षांपासून समाजमाध्यमांचा मोठा वापर वाढला आहे. यामध्ये व्हाट्सअप तसेच फेसबुकचा वापर सर्वाधिक वाढला आहे. हे प्लॅटफॉर्म माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी निश्चितच एक सुसज्ज आणि सोपे प्लॅटफॉर्म आहेत.
अनेकदा या प्लॅटफॉर्मवर चुकीची माहितीची देवाण घेवाण होत असते. यामध्ये भोळे भाबडे शेतकरी बांधवांची देखील निराशा होत असते कित्येकदा फसवणूक देखील केली जाते. या समाज माध्यमांमध्ये गेल्या काही वर्षांपासून बाजारभावाच्या पावत्या प्रसारित केल्या जातात.
यामध्ये एक-दोन क्विंटल मालाला चांगला दर मिळाला असला की ती पावती मोठ्या प्रमाणात व्हायरल केली जाते. अनेकदा बाजार समितीमध्ये 14 पट्टीवर खाडाखोड केलेली असते. म्हणजेच जाणून बुजून शेतकऱ्यांना चुकीची माहिती उपलब्ध करून दिली जाते. आता अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीने याबाबत आक्षेप नोंदवला असून थेट पोलीस स्टेशन गाठलं आहे. अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती कापसाचा लिलावासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जाते.
आता या बाजार समिती प्रशासनाने फसवे बाजारभावावर आळा घालण्यासाठी पोलीस स्टेशनचे दरवाजे ठोठावले आहेत. बाजार समिती प्रशासनाने चुकीच्या कापूस बाजारभावाची पावती व्हाट्सअप वर वायरल करणाऱ्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. बाजार समितीचे सचिव सुधाकर किसनराव दाळू यांनी याबाबत लेखी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे.
सुधाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 नोव्हेंबर रोजी अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल ते 8845 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव कापसाला मिळाला. मात्र व्हाट्सअप वर एक जुनी पावती व्हायरल करण्यात आली असून त्यामध्ये बाजार भाव 10140 रुपये प्रति क्विंटल दाखवला जात आहे. यामुळे शेतकरी बांधवांमध्ये बाजारभावाबाबत संभ्रम निर्माण होतो.
यामुळे चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. निश्चितच शेतकरी बांधवांनी व्हाट्सअप वर येणाऱ्या पावत्यांवर विश्वास ठेवण्या अगोदर त्याची शहानिशा करायला हवी. तसेच बाजारात काही मोजक्याच मालाला चांगला विक्रमी दर मिळत असतो आणि उर्वरित बहुतांशी माल हा कमी दरात विक्री होतो हे तर आपणा सर्वांनाच माहिती आहे.
यामुळे शेतकरी बांधवांनी उच्चांकी बाजारभावाकडे लक्ष न घालता सरासरी बाजारभावाकडे लक्ष देऊन मालाची विक्रीसाठी योग्य नियोजन आखने अनिवार्य राहणार आहे. तसेच शेतकरी बांधवांनी बाजारभावाची शहानिशा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर गेलं पाहिजे किंवा तत्सम बाजार समिती मधून बाजारभावाची माहिती जाणून घेतली पाहिजे.