Kapus Bajarbhav : गेल्या काही दिवसांपासून कापसाच्या दरात रोजाना वृद्धी होत आहे. साहजिकच यामुळे कापसाला कमी दर मिळत असल्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. कापसाची दहा हजाराकडे वाटचाल सुरू आहे.
यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. काल झालेल्या लिलावात देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला विक्रमी दर मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, काल देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 300 क्विंटल लोकल कापसाची आवक झाली होती.
काल झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कापसाला 9400 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 9650 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 9500 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
निश्चितच जळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाने साडेनऊ हजार रुपये प्रतिक्विंटल सरासरी बाजार भावाचा टप्पा गाठला असल्याने, जाणकार लोकांनी गेल्या महिन्यात वर्तवलेली नऊ हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजार भावाची भविष्यवाणी खरी ठरली आहे.
दरम्यान आता कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना कापसाचे बाजार भाव दहा हजार रुपये प्लस जातील अशी आशा वाटू लागली आहे. जाणकार लोकांनी कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना 9000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार भाव ध्यानात ठेवून कापसाची टप्प्याटप्प्याने विक्री करत राहण्याचा सल्ला दिला आहे.
खरं पाहता यावर्षी कापसाचा हंगाम विजयादशमीच्या दिवशी सुरू झाला. दरवर्षी विजयादशमीच्याच दिवशी कापूस हंगाम सुरू होतो. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला मौहूर्ताच्या कापसाला तब्बल 16 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर खानदेशात मिळाला असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या वेगाने व्हायरल झाल्या होत्या.
तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद मध्ये देखील मुहूर्ताच्या कापसाला तब्बल 11 हजार रुपये प्रतिक्विंटलचा बाजार भाव मिळाला असल्याचे काही मीडिया रिपोर्ट मध्ये नमूद करण्यात आले होते. अशा परिस्थितीत या हंगामात कापसाला गेल्यावर्षीप्रमाणेच कधी नव्हे तो उच्चांकी बाजार भाव मिळेल अशी शेतकऱ्यांची आशा होती. मात्र मुहूर्ताचा काही कालावधी वगळता या हंगामात कापूस दर मोठ्या दबावात पाहायला मिळालेत.
परंतु आता आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढली असल्याने तसेच बाजारात तेलबीया पेंड महागले असल्याने सरकी पेंडची मागणी वाढली असल्याने कापूस दरात वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. निश्चितच 9650 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव कापसाला महाराष्ट्रात मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना येत्या काही दिवसात कापूस दरात वाढ होण्याची आशा आहे.