Kapus Bajarbhav : कापूस उत्पादकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कापूस दरात मोठी वाढ होणार असल्याचा दावा जाणकारांनी केला आहे. खरं पाहता यावर्षी कापसाच्या पेरण्या बहुतांशी भागात लांबल्या. परिणामी शेतकऱ्यांना उशिराने उत्पादन मिळाले.
दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात कापसाची खरेदी सुरू होते मात्र यंदा उशिरा उत्पादनाला आल्याने नोव्हेंबर मध्ये कापूस खरेदीला सुरुवात झाली. खरेदीची सुरुवात अतिशय जोमदार झाली. राज्यातील खानदेश प्रांतात कापूस पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यात कापसाला 14 हजार रुपयांचा दर मिळाला.
तर इकडे औरंगाबाद विभागातील सिल्लोड तालुक्यात कापसाला 11,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला होता. हा दर मात्र जास्त काळ टिकू शकला नाही. खरं पाहता हा दर मुहूर्ताच्या कापसाला देण्यात आला होता. यामुळे याचा फायदा देखील केवळ बोटावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांनाच झाला. मात्र याचा शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला.
बाजारात विक्रमी दरात कापसाची विक्री होत असल्याने शेतमजुरांनी कापूस वेचणीसाठी अधिकच्या पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. वेचणीचे दर मजुरांनी वाढवले. वेचणीचे दर वाढले आणि बाजारात कापसाच्या दरात घसरण झाली. मध्यंतरी 9,000 रुपये प्रति क्विंटल एवढा कापसाला दर मिळत होता.
यानंतर मात्र गेल्या डिसेंबर महिन्यात कापूस सात हजार रुपये ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान विकला जाऊ लागला. आता या नवीन वर्षात कापसाला पुन्हा एकदा 9,000 चा दर मिळू लागला आहे. यामुळे पुन्हा एकदा कापूस उत्पादकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
डिसेंबर 2022 मध्ये मिळत असलेल्या दराशी तुलना केली असता सध्या दोन हजार रुपये प्रति क्विंटल अधिक दर कापसाला मिळत आहे. अशा परिस्थितीत काही मीडिया रिपोर्ट मध्ये लवकरच कापूस दरात मोठी झळाळी येणार असल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर मार्च महिन्यात कापसाला 14,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळू शकतो.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कापसाची टप्प्याटप्प्याने विक्री करण्याचा सल्ला देखील दिला जात आहे. मात्र, कापूस दरात वाढ होईल की नाही हे सर्वस्वी बाजारातील मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून राहणार आहे. उत्पादनात घट झाली असल्याचा शेतकऱ्यांचा दावा असल्याने जर उत्पादनात खरंच घट झाली आणि मागणीच्या तुलनेत कापूस बाजारात कमी पडला तर दरवाढीची शक्यता तयार होणार, हे मात्र नक्की आहे.
जाणकार लोकांच्या मते भाववाढ होईल यामुळे सर्वच कापूस शेतकऱ्यांनी साठवणूक करून ठेवू नये तसेच भावात मोठी घसरण होईल यामुळे सर्वच कापूस बाजारात एकदाच विक्रीसाठी आणू नये. जेणेकरून बाजारातील आवकेचा दरावर परिणाम होणार नाही.
एकंदरीत शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा आढावा घेत परवडणारा दर मिळाला की कापसाची टप्प्याटप्प्याने विक्री केली पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीपासून वाचता येणे शक्य होणार आहे.