Kapus Bajarbhav : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची खानदेश मराठवाडा विदर्भ महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते.
सध्या कापसाची वेचणी सुरू असून शेतकरी बांधव कापूस विक्री करत असल्याचे चित्र आहे. दरम्यान नेहमीप्रमाणेच गावोगावी जाऊन व्यापाऱ्यांकडून कापसाची खरेदी होत आहे. खानदेश मध्ये तसेच मराठवाड्यात देखील खेडा कापूस खरेदीला जोर आला आहे. व्यापारी लोक गावोगावी जाऊन शेतकऱ्यांकडून कापसाची खरेदी करत आहेत.
सध्या मराठवाड्यात व्यापाऱ्यांकडून खेडा खरेदीमध्ये कापसाला साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळत आहे. नांदेड जिल्ह्यात कापसाला नऊ हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर खेडा खरेदीत मिळू लागला आहे.
दरम्यान शेतकरी बांधव आता फक्त प्रपंच भागेल अशा पद्धतीने म्हणजेच निकडीनुसार कापूस विक्री करत आहेत. शेतकरी बांधवांना येत्या काही दिवसात कापूस दरात वाढ होण्याची शक्यता असल्याने ते पोटापुरता कापूस विकत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, व्यापारी शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करून कापसाचे साठवणूक करत आहेत. यामुळे कापूस दरात लगेचच वाढ होण्याची शक्यता दिसत नाही. कापसाला बारा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळू शकतो अशा चर्चा खान्देश मध्ये रंगल्या आहेत. यामुळे सध्या कापसाची गरजेपुरतीच विक्री होत आहे. शेतकरी बांधव गरजेपुरता कापूस खेडा खरेदीत विकत आहेत.
मात्र असे असले तरी खेडा खरेदीत कापूस विक्री करताना शेतकऱ्यांनी मापात फसवणूक होऊ शकते याची काळजी घ्यावी. तसेच व्यवहार करताना रोखीनेच व्यवहार करावा अन्यथा शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निश्चितच, कृषी क्षेत्रातील जाणकारांनी तूर्तास कापसाच्या दरात मोठी वाढ होणार नसल्याचा अंदाज वर्तवला असला तरी देखील शेतकऱ्यांना कापसाच्या बाजारभावात गेल्यावर्षीप्रमाणेच विक्रमी वाढ होऊन 12,000 प्रतिक्विंटल पर्यंत दर मिळण्याची आशा आहे.