Kapus Ani Soyabean Anudan Kharif 2023 : गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला. गतवर्षीच्या खरीप हंगामात दुष्काळामुळे पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली. सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला. विशेष म्हणजे उत्पादनात घट आलेली असतानाही बाजारात कापसाला आणि सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळाला.
यामुळे शेतकऱ्यांना अक्षरशा पीक उत्पादनासाठी आलेला खर्च देखील भरून काढता आला नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात नाराजी वाढत होती. कापसाला आणि सोयाबीनला अनुदान दिले गेले पाहिजे अशी मागणी जोरदार होते.
या पार्श्वभूमीवर सरकारने कापसाला आणि सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कमाल दहा हजार आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कमाल दहा हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
तसेच ज्या शेतकऱ्यांचे वीस गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असेल अशा शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय देखील यामध्ये झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे यासाठीचा शासन निर्णय नुकताच निर्गमित झाला असून हे अनुदान वितरित करण्यासाठीची कारवाई आता सुरू झाली आहे.
यासाठी राज्यातील ई पिक पाहणी एप्लीकेशन किंवा पोर्टलवर नोंदणी केलेले शेतकरी पात्र ठरणार आहेत. दरम्यान आता याच संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना अनुदानाचा लाभ घेण्यासाठी संमतीपत्र द्यावे लागणार आहे.
पात्र शेतकऱ्यांची माहिती घेण्यासाठी आधारची माहिती वापरण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. पण यासाठीचे संमती पत्र शेतकऱ्यांना द्यायचे आहे. एवढेच नाही तर सामायिक खातेदाराला ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच एनओसी देखील द्यावी लागणार आहे. संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र कृषी सहाय्यकाकडे जमा करायचे आहे.
संमती पत्रामध्ये काय माहिती विचारली आहे
संमतीपत्रामध्ये कापूस अन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे सर्व वैयक्तिक माहिती द्यावी लागणार आहे. यामध्ये जिल्हा, तालुका, गाव, संपूर्ण नाव अशा माहितीचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे संमती पत्र भरताना आधारकार्डवर जी माहिती आहे तीच माहिती भरायची आहे. संमतीपत्रावर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतून नावासंबंधीची माहिती भरावी लागणार आहे.
त्यानंतर आधार क्रमांकाच्या रकान्यात आधार क्रमांक लिहायचा आहे. आधार क्रमांक इंग्रजीमध्ये लिहायचा आहे. त्यानंतर खाली दिनांक सुद्धा लिहायचा आहे. मग अर्जदार शेतकऱ्याने सही करून आपले नाव लिहायचं आहे. आता सामायिक खातेदारांना हरकत पत्र भरून द्यावं लागणार आहे.
खरे तर सामायिक खातेदार असणाऱ्या शेतकऱ्यांपैकी एकाच शेतकऱ्याच्या खात्यावर या अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत. यामुळेच हे ना हरकत प्रमाणपत्र सदर शेतकऱ्यांकडून भरून घेतले जाणार आहे. दरम्यान आता आपण संमतीपत्र आणि ना हरकत पत्र कुठून डाऊनलोड करायचे हे जाणून घेणार आहोत.
संमतीपत्र अन ना हरकत प्रमाणपत्र कुठं डाउनलोड करणार
https://drive.google.com/file/d/1Ob3ufxc3EJLyCfYbXbbo6R15RYBFXXaY/view?pli=1 या लिंक वर जाऊन तुम्ही संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकता. हे प्रमाणपत्र डाऊनलोड केल्यानंतर त्याच्या प्रिंट आऊट काढून घ्या. यानंतर संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र काळजीपूर्वक भरून तुमच्या कृषी सहाय्यकाकडे जमा करून द्या.