Kanda Niryat : सध्या लोकसभा निवडणुकीचा काळ सुरू आहे. लोकसभा निवडणुकीचे दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. उद्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे मतदान हे संपूर्ण देशभरात एकूण सात टप्प्यात आणि महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात होणार आहे.
दरम्यान या निवडणुकीच्या काळात कांद्याचा मुद्दाम खूपच गरम आहे. केंद्र शासनाच्या धोरणामुळे कांद्याला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात नाराजी आहे.
विरोधकांकडून या नाराजीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच मात्र केंद्रातील सरकारने शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी कांदा निर्यात सुरू केली आहे. कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यात आली असल्याने याचा सकारात्मक परिणाम बाजारावर पाहायला मिळाला आहे.
बाजारभावात थोड्याफार प्रमाणात का होईना पण सुधारणा झाली आहे. अशातच आता कांदा उत्पादकांसाठी आणखी एक गोड बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सरकार शेतकऱ्यांकडून पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे.
एन सी सी एफ चे अध्यक्ष विशाल सिंग हे याच पार्श्वभूमीवर पिंपळगाव बसवंत येथे आले होते. यावेळी त्यांनी कांदा खरेदी बाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. विशाल सिंग यांनी सांगितल्याप्रमाणे, नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून रब्बी हंगामातील पाच लाख टन कांदा खरेदी होणार आहे.
यातील अडीच लाख टन कांदा नाफेड आणि अडीच लाख टन कांदा एनसीसीएफ खरेदी करणार असे त्यांनी म्हटले आहे. याच खरेदी प्रक्रियेची तयारी तपासण्यासाठी विशाल सिंग यांनी पिंपळगाव बसवंत येथे हजेरी लावली होती.
यावेळी त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला आणि खरेदी प्रक्रियेची माहिती दिली. यावेळी त्यांनी येत्या जून महिन्यापर्यंत नाशिक, पुणे, हरियाणा आणि गुजरात येथून पाच लाख टन कांद्याची खरेदी होणार असल्याचे म्हटले आहे.
शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या मोबदल्यात दिले जाणारे पेमेंट हे थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा अकाऊंटवर जमा होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे ही खरेदी प्रक्रिया उद्यापासून अर्थातच 7 मे पासून सुरू केली जाणार आहे. यासाठी सुरुवातीला 50 खरेदी केंद्र सुरू होणार आहेत.
दरम्यान, कांदा निर्यात बंदी उठावली गेली असल्याने आणि आता कांदा खरेदी सुरू होणार असल्याने बाजारभावात आणखी थोडीशी सुधारणा पाहायला मिळू शकते असा विश्वास तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे.